Sharad Pawar on Political Crisis: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होतो की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात नवा ‘उदय’ होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही थेट दावोसवरून व्हिडीओद्वारे हा दावा खोडून काढलाच, त्याशिवाय ठाकरे गटाचे अनेक नेते माझ्या संपर्कात असल्याचे म्हटले. शिवसेना ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार आणि १० माजी आमदार आणि काँग्रेसचे ५ आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला होता. यावर शरद पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर देत राजकीय भूकंपाशी संबंधित विषयावर भूमिका मांडली.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मी उदय सामंत यांचे विधान ऐकले. दावोस येथे ते गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की, पक्ष फोडण्यासाठी गेले होते? दावोस येथे त्यांनी केलेली विधाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा जो उद्देश होता, त्याच्याशी सुसंसगत नव्हती.” शरद पवार पुढे म्हणाले, काही खासदारांचे फोटो मी पाहिले. तरीही ते लोक ठाकरेंची शिवसेना सोडतील, असे मला अजिबात वाटत नाही. कारण हे लोक वाटेल ते करतील पण बाळासाहेबांची विचारधारा सोडणार नाहीत.
दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले त्यातील बहुसंख्या कंपन्या भारतीय होत्या. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राशी करार केलेला आहे. २८ भारतीय कंपन्यांनी सामंजस्य करार केला, त्यातील २० कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यातही १५ मुंबईतील आहेत. अशी माहिती आता समोर येत असल्याचेही शरद पवार म्हणाले. या कंपन्या गुंतवणूक करणार हे आधीच ठरले होते, मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रित केले गेले. तिथून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा दिखावा केला गेला, असेही शरद पवार म्हणाले.
मी वाट बघतोय…
उदय सामंत २० आमदार घेऊन बाहेर पडणार का? महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? असाही प्रश्न यावेळी शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, मी वाट भघतोय हे लोक कधी बाहेर पडतात.