महापौरांच्या राजीनाम्यासाठी होणारी महापालिकेची महासभा लांबल्याने शहरात राजकीय चर्चाना गती आली असून, महापौर बदल ही सत्ताधारी काँग्रेसची राजकीय कसोटी ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महिन्याची वाढीव मुदत संपली तरी महापौर कांचन कांबळे यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ चालवल्याने इच्छुकांसह काँग्रेसही अस्वस्थ बनली आहे.
महापौर कांचन कांबळे यांना काँग्रेस नेते मदन पाटील यांनी राजीनामा देण्याचे आदेश डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दिले होते. यानुसार महापौर व उपमहापौर यांचा राजीनामा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होणाऱ्या महासभेत घेण्याचा निर्णय पक्षीय पातळीवर घेण्यात आला होता.
तथापि माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्यासाठी मोच्रेबांधणी सुरू केली असून, माजी पालकमंत्री डॉ. कदम यांच्या गटाला निर्णयप्रक्रियेत डावलले जात असल्याचा आरोप करीत सवतासुभा मांडण्याचा प्रयत्न केला होता. नायकवडी यांची नाराजी स्थायी सभापती निवडीवेळी महागात पडणार हे लक्षात येताच वेगळी व्यूहरचना करण्यात आली. मात्र डॉ. कदम यांनी हस्तक्षेप करीत स्थायी सभापतिपदी संजय मेंढे यांना संधी देत राजकीय तोडगा काढला.
तथापि, महापालिकेच्या सत्ताधारी गटात महापौर व उपमहापौर निवडी या कळीच्या ठरणार असल्याने सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. मदन पाटील यांनी नोव्हेंबरमध्येच पदाधिकारी बदलाचे संकेत दिले होते. मात्र विद्यमान पदाधिकाऱ्यांनी एक महिन्याची मुदत वाढवून देण्याची विनंती केल्याने पदाधिकारी बदल लांबला होता. सदस्यातील अस्वस्थता लक्षात घेऊन जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पदाधिकारी बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र पदाधिकारी बदलाचा निर्णय होऊनही महापौरांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याच्या चच्रेने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. महापालिकेची महासभा १९ जानेवारी रोजी घेण्याचे प्रयोजन आहे. तोपर्यंत ही चर्चा कायम राहणार असून पदाधिकारी बदल करण्याचे निश्चित झाले तर नाराज सदस्यांची समजूत काढण्याबरोबरच कदम गटाचे रुसवे-फुगवे काढण्यासाठी ताकद खर्च करावी लागणार आहे. सांगलीचे आगामी महापौरपद मिरजेच्या विवेक कांबळे यांना देण्याचे मदन पाटील यांनी मान्य केल्याचे सांगितले जात असले तरी ऐनवेळी स्थायी सभापती, गटनेते ही महत्त्वाची पदे मिरजेस देण्यात आल्याने सांगलीतूनही आग्रही मागणी होण्याची शक्यता आहे.

Story img Loader