सांगली महापालिका निवडणुकीत अंतिम क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन अधिकृत उमेदवारांनी शुक्रवारी आपली उमेदवारी काढून घेतल्याने पक्षाला या ठिकाणी डमी उमेदवार पुरस्कृत करावा लागत आहे. यामुळे ‘मिरज पॅटर्न’च्या धक्कातंत्राचा जोरदार धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असून, महापौरांच्या अपात्रतेनंतर नव्याने राजकीय समीकरणे समोर येत आहेत.
प्रभाग ३०मधून महापौर इद्रिस नायकवडी यांची उमेदवारी रद्दबातल ठरताच या ठिकाणी काँग्रेसने अतहर नायकवडी यांना पुढे केले आहे. याच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिला गटासाठी कौसर मैनुद्दीन बागवान व सर्वसाधारण पुरुष गटासाठी जमील शमशुद्दीन बागवान यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले होते. छाननीनंतर या दोघांची नावे पात्र उमेदवारांमध्ये निश्चित झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते साजिदअली पठाण यांनी महापौर नायकवडी यांच्यासह पत्नी आयेशा नायकवडी यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला होता. या आक्षेपानंतर नायकवडी यांची उमेदवारी रद्द झाली. मात्र आयेशा नायकवडी यांच्याबाबतचा आक्षेप फेटाळून लावल्यानंतर त्यांची उमेदवारी कायम राहिली.
या राजकीय डावपेचाला शह देण्याचा प्रयत्न शुक्रवारी समोर आला. माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या पत्नी कौसर बागवान व बंधू जमील बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली अधिकृत उमेदवारी नाकारली आणि आपली उमेदवारी मागे घेतली. या प्रभागात महिला ओबीसी  गटासाठी बिलकिसबानू मुतवल्ली आणि सर्वसाधारण गटासाठी जहिराबी बरकत अली पठाण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत.
दरम्यान, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती इब्राहिम चौधरी यांना गुरुवारी निवडणुकीस अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी आज उच्च न्यायालयात धाव घेतली. आंदोलनावेळी महापालिका इमारतीवर दगडफेक झाल्यानंतर दाखल झालेल्या खटल्यात महापौर नायकवडी यांच्यासह २३ जणांना दोन वर्षे सक्त मजुरी व २५००/- रुपये दंडाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे नायकवडी व चौधरी या दोघांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले. नैसर्गिक न्यायाची मागणी करीत चौधरी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अशीच शिक्षा झालेले अन्य चौघेजण निवडणूक मैदानात आहेत. यामध्ये मैनुद्दीन बागवान, (राष्ट्रवादी काँग्रेस), सुरेश आवटी (काँग्रेस), मकरंद देशपांडे (स्वाभिमानी विकास आघाडी) आणि जयगोंड परगोंड (अपक्ष)यांचा समावेश आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज मात्र कायम आहे.
संभाव्य कारवाई लक्षात घेऊन काँग्रेसचे सुरेश आवटी यांनी आपल्या प्रभागात डमी म्हणून दाखल केलेला मुलगा संदीप आवटी यांची उमेदवारी आज कायम ठेवली.  
सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अपवाद वगळता बहुसंख्य ठिकाणी बहुरंगी लढती होत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. २५१ उमेदवारांनी आपले उमेदवारीअर्ज मागे घेतले. महापालिकेच्या ३७ प्रभागामध्ये ७८ जागांसाठी  होत असलेल्या निवडणुकीसाठी आता रिंगणात ४३५ उमेदवार उरले आहेत. ६८६ पात्र उमेदवारांपैकी २५१ उमेदवारांनी माघार घेतली आहे.

Story img Loader