नव्यानेच स्थापित झालेल्या गुहागर व देवरुख नगरपंचायतींची पहिली सार्वत्रिक निवडणूक येत्या ३१ मार्चला होणार असून, प्रक्रिया शुक्रवार (१ मार्च) पासून सुरू झाली आहे. ऐन शिमगोत्सवात होणाऱ्या या निवडणुकीला सर्व ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी महायुती व आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान गुहागर नगरपंचायतीत असगोली गावाचा समावेश करू नये, या मागणीवर असगोली ग्रामस्थ आजही ठाम असून त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशाराही दिला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत गुहागर, देवरुख व लांजा या तीन ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात येईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी दिले होते. त्याची त्यांनी पूर्तताही केली. आता गुहागर व देवरुख नगरपंचायतींच्या पहिल्याच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. शिवसेना-भाजप-आरपीआय महायुती व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल-बहुजन विकास-कुणबी सेना महाआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. तर महायुती व आघाडीत इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी झाली असून, प्रत्येक जण आपले घोडे पुढे दामटवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ऐन शिमगोत्सवातच सर्वच राजकीय पक्षांची रणधुमाळी रंगणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत.
असगोली ग्रामस्थांचा बहिष्कार?
गुहागर तालुक्यातील असगोली गावाचा नगरपंचायतीत सामील होण्यास प्रथमपासूनच विरोध आहे. याबाबत ग्रामसभेने केलेला ठरावही शासनाने बासनात गुंडाळून ठेवल्याने त्यांच्या विरोधाची धार अधिक तीव्र झाली. नगरपंचायतीत समावेश करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध असगोली ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान अर्ज दाखल केला असून, त्याचा निकाल २६ मार्चला अपेक्षित असून तो आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी देवळात झालेल्या एका सभेत गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीवर पूर्णत: बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
असगोलीकरांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय खरोखरच अमलात आणला तर त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसलाच होईल, यामुळे भाजपचे पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. यावर उपाय म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरुद्ध गुहागरातील भाजप उमेदवाराला असगोलीतून निवडणुकीत उतरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पालकमंत्र्यांकडे सर्वाधिकार
रत्नागिरी जिल्ह्य़ातील गुहागर व गुहागर तसेच सिंधुदुर्गातील कणकवली या तीन नगरपंचायतींची प्रथमच निवडणूक होत असून या निवडणुकीचे सर्वाधिकार राज्यमंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांच्याकडे सोपवून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर आपला विश्वास असल्याचे दाखवून दिले आहे. आपल्या मुलांच्या लग्नातील शाही थाट आणि पंचपक्वान्नांच्या जेवणावळी यामुळे स्वपक्षासह विरोधकांच्याही टीकेचे लक्ष्य ठरलेले पालकमंत्री जाधव यांच्यावर प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या निवडणुकीची सर्वस्वी जबाबदारी सोपविल्याने जाधव समर्थकांमध्ये आनंदाचे, तर स्वपक्षातील विरोधकांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरल्याचे दिसून येते.
निवडणूक कार्यक्रम
दि. १ ते ७ मार्च १३ – उमेदवारी अर्ज दाखल करणे.
दि. ८ मार्च १३ – अर्जाची छाननी.
दि. १८ मार्च १३ – अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख.
दि. ३१ मार्च १३ – मतदान (स. ७.३० ते सायं. ५.०० पर्यंत).
दि. १ एप्रिल १३ – मतमोजणी व निकाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political fight in holi festival
Show comments