मोहनीराज लहाडे
नगर: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा घाट सावरगाव येथील दसरा मेळावा आटोपताच राज्यातील विविध पक्षांचे नेते भगवानबाबांच्या समाधीसमोर लीन होण्यासाठी भगवानगडावर दाखल होऊ लागले आहेत. हा निव्वळ योगायोग की घडवून आणलेला योग याची चर्चा सध्या सुरू आहे. वंजारी समाजाची मते डोळय़ासमोर ठेवूनच राजकीय नेत्यांच्या भेटी वाढल्याचा अर्थ काढला जात आहे.
भगवानगडाला जसे धार्मिक महत्त्व आहे तसेच तेथील दसऱ्या मेळाव्याला आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घटनांना राजकीय महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. दसरा मेळाव्याने अनेक राजकीय वादही निर्माण केले आहेत. त्याला मोठा इतिहासही आहे. भगवानगडाशी भावनिकदृष्टय़ा जोडलेल्या समाजाला आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न या माध्यमातून होत असतात. पंकजा मुंडे यांचा भगवानगडाशी झालेल्या दुराव्याचा फायदा मिळवण्याचा प्रयत्नही त्या माध्यमातून सुरू दिसतो.
घाट सावरगाव येथील पंकजा मुंडे यांचा मेळावा आटोपताच लगोलाग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भगवानगडाला भेट देत बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्या वेळी पटोले यांच्यासमवेत स्व. गोपीनाथ मुंडे यांचे तत्कालीन समर्थक परंतु आता काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यानंतर लगेच दोन दिवसांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेत महंतांशी बंद दरवाजाआड चर्चा केली. राजकीय नेत्यांच्या लागोपाठच्या भेटीची चर्चा होऊ लागली असतानाच लगेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनीही गडाच्या पायऱ्या चढत बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. महंतांशी बंद खोलीत संवाद साधला. अमित ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्राचा राजकीय संपर्क दौरा सुरू केला असून ते मराठवाडय़ात आहेत.
शिर्डी, शनिशिंगणापूरनंतर भगवानगड
नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर देवस्थानाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहे. दोन्ही ठिकाणांच्या दर्शनासाठी राजकीय नेत्यांचा ओघ वर्षभर सातत्याने सुरू असतो. आता हा प्रकाशझोत भगवानगडाकडेही वळाला की काय, अशी शंका भाविकांच्या मनात निर्माण झाली आहे. भगवानगडावरील दसरा मेळावाप्रमाणेच ‘नारळी सप्ताह’ही प्रमुख कार्यक्रम समजला जातो. मात्र गाजतो तो ‘दसरा मेळावा’. गडावरील दसरा मेळावा आणि त्यानिमित्ताने भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या होणाऱ्या सभा याचे समीकरण पूर्वी जुळले होते. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी तेथे मेळावा घेतला. मेळाव्यात ते काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागे. ‘गडावरून मला दिल्ली दिसते आहे’ यासह ‘पंकजा माझी वारसदार’ अशी त्यांची वक्तव्ये राजकीयदृष्टय़ा महत्त्वाची ठरली. मुंडे यांच्यासमवेत गडावरील सभेस इतरही पक्षांचे नेतेही आठवणीने हजेरी लावत. मेळाव्यातील गर्दीचे ‘माहात्म्य’च तसे मोठे आहे. याच मेळाव्यातून स्व. मुंडे आणि माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्यातील वादाची ठिणगी उडाली होती. या वादानंतर नंतर ढाकणे यांनी मेळाव्याला कधी हजेरी लावली नाही.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या मेळाव्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेतून झालेली आचारसंहिता भंगाची अभूतपूर्व घटना घडली. त्यानंतर गडाचे महंत डॉ. शास्त्री यांनी गडावर सभा घेण्यास मनाई करण्याची भूमिका घेतली. त्यातून पंकजा मुंडे यांना राजकीयदृष्टय़ा धक्का बसला. या घडामोडींनी महाराष्ट्राचे लक्ष वेधले. त्यानंतर मुंडे यांनी जवळच असलेल्या घाट सावरगाव येथे मेळावा घेण्यास सुरुवात केली. आता अनेक भाविक गडाचे दर्शन घेतल्यानंतर मुंडे यांच्या मेळाव्याला हजेरी लावू लागले आहेत. नगर जिल्ह्यातील भाजप नेतेही या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहू लागले आहेत. मेळाव्यातील पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यांना राजकीय महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. यंदा मुंडेविरोधकांच्या कृती समितीने घाट सावरगाव येथील मेळाव्याला गर्दी होऊ नये या उद्देशाने भगवानगडाच्या पायथ्याशी प्रति दसरा मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला अटकाव केला. या घटनेची चर्चा झाली. त्यानंतर लगेचच राजकीय नेत्यांच्या भेटी सुरू झाल्या, हाही एक योगायोग मानावा लागेल का?
गडावर होणारी गर्दी, ऊसतोडणी कामगारांचे असलेले भावनिक नाते राजकीय नेत्यांना पूर्वीपासून आकर्षित करत आहेत. महंतांनी घेतलेल्या भूमिकेतून झालेल्या वादानंतर पंकजा मुंडे यांनी घाट सावरगाव येथे मेळावा घेण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्या भगवानगडाकडे आलेल्या नाहीत. आता गडाला भेट देण्यासाठी राजकीय नेते गडाची पायरी चढू लागल्याने त्याची भाविकांत चर्चा होते आहे.
गड सर्वसामान्यांचा आहे. तिथे दर्शन घेण्यासाठी कोणीही जाऊ शकते. दसरा मेळावा दरवर्षी होतो, परंतु यंदाच अचानक राजकीय नेते भेटी का देऊ लागले आहेत, असा प्रश्न मलाही पडला आहे. गडाच्या महंतांनी यापूर्वी राजकीय मेळावे होणार नाहीत, असे जाहीर केले आहे. कोणी जर राजकीय वापर करत असेल तर तो आम्ही होऊ देणार नाही. महंतांनीही राजकीय विषयाला महत्त्व देऊ नये.
– अरुण मुंडे, जिल्हाध्यक्ष, भाजप, नगर
भगवानबाबांपासून गडावर राजकीय नेत्यांचे येणे-जाणे, वावर आहे. यशवंतराव चव्हाणही येत असत. मध्यंतरी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत सर्वपक्षीय राजकीय नेते मेळाव्यास उपस्थित राहात. ते सर्व जण केवळ आशीर्वाद घेण्यासाठी. पंकजा मुंडे आल्या तरी आडकाठी होण्याचे कारण नाही. गडाचे दरवाजे सर्वासाठी खुले आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चा होऊ नये. अमित ठाकरे यांचा दौरा अचानक नव्हे तर पूर्वनियोजित होता.
– देवीदास खेडकर, जिल्हाध्यक्ष, मनसे, नगर