सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ४० दिवसांची मुदत घेऊनही प्रत्यक्षात आरक्षणाचा निर्णय न घेतल्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेटले आहे. सोलापूर जिल्ह्यात दोनशे गावांमध्ये सर्व मंत्री व आमदार-खासदारांसह राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येत्या २४ तासांत शंभर टक्के गावांमध्ये ही बंदी लागू केली जाणार असल्याचे सकल मराठा समाजाने जाहीर केले आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारने मुदत घेऊनही काहीच निर्णय न घेतल्याने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यात अंतरावली-सराटी गावात पुन्हा आमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाने साखळ उपोषण सुरू केले. जिल्ह्यात तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयासमोरही साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>शिंदे गटाच्या मंत्र्याची मनोज जरांगेंनी महत्त्वाची विनंती; मराठा आरक्षण देण्याबाबत केलं सूचक विधान
सोलापुरात सुरू झालेल्या साखळी उपोषणात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले असून यावेळी सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शनेही करण्यात आली. सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्यासह जयकुमार माने, विनोद भोसले (काँग्रेस), हेमंत पिंगळे (भाजप), राजन जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), प्रा. गणेश देशमुख व इतरांनी हे आंदोलन हातात घेतले आहे. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीयमंत्री नारायण राणे, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रामदास कदम या मराठा समाजाच्या नेत्यांची गद्दार म्हणून संभावना करण्यात आली.