भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची आज प्राणज्योत मालवली. आज संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दरम्यान, त्यांच्या निधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
“प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावला”
“ही अतिशय दुख:द बातमी आहे. आपण एक सच्चा, प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे. गिरीश बापट हे गेली अनेक वर्ष सक्रीय राजकारणात होते. त्यांच्या कारकीर्द नगसेवकापासून सुरू झाली. पुढे ते मंत्रीही आणि खासदारही झाले. मंत्रीमंडळात काम करताना आम्ही शेजारीच बसत होतो. त्यांच्या निधनाने भाजपाची तर हानी झालीच, पण आपण एक सच्चा लोकसप्रतिनिधी गमावला आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
“अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेलं”
“भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने जमिनीशी नाळ असलेले आणि राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. विकास हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. पक्षनिष्ठ, पण पक्षापलीकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे”, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
“पुणेकरांच्या दुख:त सहभागी होणारा नेता आज काळाच्या पडद्याआड”
“गिरीश बापट हे पुणे शहराच्या राजकारणात गेली ४० वर्ष सक्रीय होते. ३५ वर्ष आम्ही पुण्यात बरोबर काम केलं. पुणे महापालिका, विधानसभा आणि लोकसभेत त्यांन केलेलं काम अतिशय उल्लेखनीय होतं. पुणेकरांच्या सुख-दुख:त सहभागी होणारा नेता आज काळाच्या पडद्याआड केला”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली.
“गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणं पोरकं झालं”
“भाजपा ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार गिरीश बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने बापट कुटुंबियांबरोबरच भाजपाच्या परिवारावरदेखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ते नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. गिरीश बापट यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख निर्माण केली. आज त्यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे, आमचा मार्गदर्शक हरपला आहे”, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
हेही वाचा – टेल्को कंपनीत कामगार ते खासदार; गिरीश बापट यांची कारकिर्द
“लोकप्रिय लोकनेता हरवला”
“गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी आताच ऐकली. ही अतिशय दुख:द बातमी आहे. खूप वाईट वाटलं. गिरीश बापट आणि मी संसदेत बरोबरीने काम केलं. संसदेच्या एस्टीमेट समितीचे ते अध्यक्ष होते आणि मी त्या समितीचा सदस्य होतो. त्यांचे आणि आमचे सलोख्याचे संबंध होतो. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. लोकप्रिय लोकनेता असं त्यांचं वर्णन करता येईल”, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
“दिलखुलास व्यक्तिमत्व निघून जाणं वेदनादायी”
“आज मी अतिशय जवळचा मित्र गमावला आहे. आम्ही अनेक वर्ष बरोबर काम केलं. त्यांच्या बरोबरच्य अनेक आठवणी आहेत. गिरीश बापट एक दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. त्यांचं असं आपल्यातून निघून जाणं वेदनादायी आहे. त्यांच्या निधनानं भाजपाची खूप मोठी हानी झाली आहे”, अशी भावना गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.
“राजकारणातील गुरुतुल्य मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड”
“भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी आली. पुणे जिल्ह्यातील एक प्रखर राष्ट्राभिमानी नेता आपण गमावला. माझ्या राजकीय जीवनात बापट यांनी कायम ताकद दिली. २०१४ ते २०१९ या काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांसाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या जाण्याने माझ्या राजकीय वाटचालीतील गुरूतुल्य मार्गदर्शक हरवलं आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.
“पुणे आज चांगल्या नेतृत्वाला मुकलं”
गिरीश बापट यांच्या निधनानंतर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “राजकीय स्तर कसा टिकवायचा हे बापटांकडून शिकावं. त्यांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. पुणे आज चांगल्या नेतृत्वाला मुकलं” अशी भावना धंगेकरांनी व्यक्त केली.