देशातील राजकीय पक्षच घटनाबाहय़ असल्याने त्यांच्या आधारावर होत असलेल्या निवडणुकाही घटनाबाहय़ असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. सत्तेचा दुरुपयोग करून पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात आणल्याचा आरोप त्यांनी केला.  
हजारे यांनी राळेगणसिद्धीत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशाच्या राज्यघटनेत राजकीय पक्षांचा कुठेही उल्लेख नाही. राजकीय पक्षांनी निवडणूक लढवावी, असेही राज्यघटनेत कुठे म्हटलेले नाही. असे असताना सन १९५२पासून याच आधारावर निवडणुका होत असून, या सर्वच गोष्टी घटनाबाहय़ आहेत. राज्यघटना अस्तित्वात आली त्याचवेळी राजकीय पक्ष बरखास्त होणे गरजेचे होते. मात्र, पहिल्या निवडणुकीपासून देशात घटनेची पायमल्लीच सुरू आहे. त्यातूनच काही राजकीय पक्षांनी देशात लोकशाहीवर अतिक्रमण केले आहे. या मंडळींनी खरी लोकशाही येऊच दिली नाही.
स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ गेले काय, असा सवाल करून हजारे यांनी म्हटले आहे, ‘पहिल्याच निवडणुकीपासून देशात राजकीय पक्षांचे बेकायदेशीर राज्य सुरू आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता याच दुष्टचक्रात मतदारांना अडकवण्यात आले आहे. या प्रक्रियेत गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोकांना केवळ त्यांच्या मागे मतांचा गठ्ठा आहे म्हणून पुढे केले जाते. अशा लोकांना घटनाबाहय़रीत्या निवडून आणून संसदेत पाठवण्यात आले. राजकीय पक्षांनी नको त्या लोकांना उमेदवारी दिली तरी लोकांनी त्याचा विचार करायला हवा होता, मात्र तसे झाले नाही.’
पहिलीच निवडणूक घटनाबाहय़ पद्धतीने लढवली गेली हा जनतेला दिलेला पहिला धोका होता. सन १९८५मध्ये पक्षांतरबंदी कायदा करून दुसऱ्यांदा जनतेला धोका देण्यात आला. राज्यघटनेत राजकीय पक्षांचाच उल्लेख नसल्याने पक्षांतरबंदीचाही प्रश्न निर्माण होत नाही. सत्तेच्या दुरुपयोगाचेच हे उदाहरण आहे. राजकीय पक्षांनी लोकशाहीवर अतिक्रमण करून ही व्यवस्थाच नेस्तनाबूत केली. मात्र आता खरी लोकशाही आणण्यासाठी जनतेने राजकीय पक्षांनाच नेस्तनाबूत केले पाहिजे. त्यासाठी आपण कोणताच राजकीय पक्ष किंवा पार्टीला मत देणार नाही असा निश्चय लोकांनीच करावा अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय पक्षव्यवस्था नेस्तनाबूत करणे हे सोपेही नाही, मात्र स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढताना मतदारांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कायद्यातील ज्ञानी मंडळींनी राज्यघटना तपासून त्यात पक्ष किंवा पाटर्य़ानी निवडणूक लढवावी असा उल्लेख कुठे केला आहे ते पाहावे. त्यानंतर पक्ष आणि पाटर्य़ा निवडणूक लढवतात ते घटनाबाहय़ आहे हे लक्षात येईल असे हजारे यांनी या पत्रकात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा