गोपीनाथ मुंडे असते तर प्रचाराला येण्याची गरज पडली नसती, असे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील भाजप नेत्यांची कुवत स्पष्ट करीत पंकजा मुंडेंना साथ देण्याची साद घातली. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्याला हजेरी लावून ओबीसी समाजाने एकजूट होऊन पंकजांच्या नेतृत्वाखाली सत्तापरिवर्तन करावे, अशा शब्दांत बळ दिले. मोदी-शहांच्या वक्तव्यांमुळे पंकजा यांच्याकडे आता जिल्हय़ाचा राजकीय आवाज म्हणून पाहिले जात आहे.
मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ बीडहून केला. गोपीनाथ मुंडे यांच्याशी ३० वर्षांचा संबंध होता. गोरगरीब, उपेक्षित समाजाचा ते आवाज होते. ते असते तर आपणास प्रचाराला येण्याची गरज पडली नसती, असे सांगत मोदी यांनी राज्याचे नेतृत्व करू पाहणाऱ्या भाजप नेत्यांची कुवतच अप्रत्यक्षपणे स्पष्ट केली. पंकजांना साथ द्या, मुंडेंची कमी भासू देणार नाही, अशी साद त्यांनी घातली. एक दिवस आधी श्री क्षेत्र भगवानगडावरील दसरा मेळाव्यात हजेरी लावून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील ओबीसी समाजाने एकजूट होऊन पंकजांच्या नेतृत्वाखाली सत्तापरिवर्तन करावे, असे आवाहन केले.
उपस्थितांमधून होत असलेल्या ‘पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा’ या घोषणांवर शहा यांनी, ‘जनतेच्या मनात काय आहे ते नेतृत्वाला कळाले असून त्यावर विचार होईल. गरीब, उपेक्षित, छोटय़ा समाजातील मोदींना जनतेने पंतप्रधान केले. त्यामुळे याच उपेक्षित छोटया समाजाच्या विकासाला केंद्र सरकारचे प्राधान्य असेल. दिवंगत मुंडे ओबीसी समाजाचा आवाज होते. त्यामुळे पंकजांच्या संघर्षयात्रेच्या समारोपाला चौंडीत व दसरा मेळाव्याला आपण गडावर आलो,’ अशा शब्दांत त्यांनी भाजपचे लक्ष्य ओबीसी समाज असल्याचे स्पष्ट केले.
दिवंगत मुंडे यांनी ४० वर्षांत राज्याच्या राजकारणात आपले नेतृत्व प्रस्थापित केले. साडेचार वष्रे सत्तेचा अपवाद वगळता कायम विरोधी पक्षात राहिलेले मुंडे त्यांच्या आक्रमकतेमुळे चच्रेत असत. राज्याचा नेता या छबीमुळे प्रत्येक निवडणुकीत जिल्हय़ातून त्यांना सहानुभूती मिळत गेली. मुंडे यांच्या उंचीइतका दुसरा नेता नसल्यामुळे त्यांच्या अकाली निधनानंतर जिल्हय़ाला राजकीय मुकेपण आले होते. कन्या पंकजा यांना त्यांचा वारसा चालवणे झेपेल का? पक्ष कितपत साथ देईल, असे अनेक प्रश्न होते. याच दरम्यान मुंडे यांच्या पश्चात केंद्रीय मंत्रिमंडळात पंकजा यांना घेण्याची शिफारस प्रदेश भाजपने केली होती. मात्र, पंकजा यांनी मी रडणार नाही, तर लढणार. मला अनुकंपावर पद नको तर मेरिटवर पाहिजे, असे ठणकावत थेट पुन्हा संघर्षयात्रा काढली.
सिंदखेड राजा ते चौंडी या ३ हजार किलोमीटर संघर्षयात्रेत लोकांनी मोठे समर्थन दिले. परिणामी भाजप प्रदेश नेतृत्वाच्या फळीत सर्वाधिक गर्दी खेचणारा तरुण चेहरा म्हणून पंकजांकडे पाहिले जात आहे. ग्रामीण भागात त्यांच्या सभांना होणारी गर्दी, त्यांच्या वक्तृत्व शैलीतील मुंडेंची झलक यामुळे अत्यंत कमी कालावधीत पंकजा यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतही दाखल झाले. भाजपचे सर्वोच्च नेते मोदी व शहा यांनी थेट जिल्हय़ात येऊन पंकजा यांना राजकीय बळ दिल्यामुळे जिल्हय़ातील जनतेत त्यांच्या नेतृत्वाबद्दल सहानुभूती व्यक्त होत आहे.