दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून अजित पवारांच्या आश्रयाला गेलेल्या ‘दादा टीम’ला निवडणुकीत मतदारांनी हात दाखवला. राष्ट्रवादीशिवाय सत्ता नाही, म्हणत बारामतीच्या कळपात जावून मुंडेंना टोकाचा विरोध करणाऱ्यांना परतीचे दोरही कापले गेले. पक्षांतराच्या खेळात बळी गेला, तो धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाचा. तर मुंडेंना संपविण्याचा विडा उचलणाऱ्यांना ‘तारे जमीन पे’ झाले असून आ. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात नव्या फळीचा उदय झाला आहे.
सत्तेच्या बळावर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मुंडेंचे सहकारी फोडून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुंडेंनीच राजकीय गुलाल लावलेल्या अनेकांनी तेव्हा पक्षांतरासाठी रांगच लावली होती. दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्यानंतर माजी केंद्रीयमंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारला. सहा वर्षांपूर्वी आष्टीचे आ. सुरेश धस यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला. परिणामी जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून रमेश आडसकर, अशोक डक, दिलीप गोरे अशा दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत नेले. हीच वाट माजलगांवचे आ. प्रकाश सोळंके यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत धरली. तीन वर्षांपूर्वी तर अमरसिंह पंडित आणि त्यानंतर मुंडेंचे पुतणे आ. धनंजय मुंडेही बारामतीच्या कळपात दाखल झाले. आठ आमदार, दोन मंत्री अशी सत्तेची फौज निर्माण झाल्याने गाव पातळीपर्यंत कार्यकर्त्यांचे पक्षांतर सुरू राहिले. पण दोन लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंचा पराभव करण्याचा विडा अनेकांनी उचलूनही यश आले नाही. या वेळी एके काळी शिष्य असलेल्या सुरेश धस मदानात आले. सारी ताकद पणाला लावली तरी मुंडेंचा दीड लाखांनी विजय झाला. तेव्हाच त्यांनी विधानसभा निवडणुकीत सत्तेची रसद पुरवून अजित पवारांनी निर्माण केलेल्या ‘दादा टीम’ला पराभूत करण्यासाठी मोच्रेबांधणी केली होती. पण त्यांचे अपघाती निधन झाल्याने दादा टीम नििश्चत झाली होती. मात्र आ. पंकजा मुंडे यांनी तोडीस तोड उमेदवार मदानात उतरवून दादा टीमचा दारुण पराभव केला. मात्र बीड मतदारसंघात जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळाला. विनायक मेटे यांनी त्यांना चांगली लढत दिली. आष्टीत सुरेश धस यांचा पराभव झाल्याने भीमराव धोंडे यांचे राजकीय पुनरागमन झाले. गेवराईत आ. अमरसिंह पंडित व बदामराव पंडित हे कट्टर विरोधक एकत्र येऊनही भाजपच्या लक्ष्मण पवारांनी साठ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवल्याने गेवराई पंडितमुक्त झाली. परळीत धनंजय मुंडेंचा अपेक्षेनुसार पराभव झाला. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत गेलेले धनंजय मुंडे भाजपबरोबर असते तर पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडेच आले असते. त्यामुळे पक्षांतराच्या खेळात सर्वाधिक नुकसान झाले ते धनंजय मुंडे यांचे. केजमधून प्रा. संगिता ठोंबरे, माजलगांवमधून आर. टी. देशमुख व अॅड. लक्ष्मण पवार हे नवीन चेहरे आमदार झाल्याने राजकारणात नवी फळी उदयाला आली.

Story img Loader