महसूल प्रशासनाचा मालेगावमध्ये उपक्रम
निरनिराळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याऐवजी ‘शासन आपल्या दारी’ या उक्तीप्रमाणे राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांच्या सहयोगाने सरकारी यंत्रणेनेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम येथील महसूल प्रशासनाने हाती घेतला आहे. या उपक्रमानुसार पहिल्या टप्प्यात सामाजिक अर्थसाहय़ व दुय्यम शिधापत्रिका उपलब्ध करून देणे अशा सात योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून त्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विनासायास व जास्तीत जास्त गरजूंना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळावा, हा या उपक्रमाचा हेतू आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना अर्जाचा नमुना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून अन्य शुल्कही माफ करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विविध पक्षीय कार्यकर्त्यांची मदत घेण्यात येणार आहे. गरजू व वंचित लाभार्थ्यांचा शोध घेऊन गावपातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये कार्यकर्त्यांनी त्या-त्या योजनेचे अर्ज भरून सादर करावेत, असे महसूल प्रशासनाला अभिप्रेत आहे. आगामी काळात सर्वच शासकीय योजनांचा लाभ अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून पहिल्या टप्प्यात दुय्यम शिधापत्रिका उपलब्ध करून देणे, सामाजिक अर्थसाहय़ योजनेंतर्गत विधवा, परित्यक्ता, अपंग व वृद्ध यांना अनुदान सुरू करणे, आम आदमी योजनेंतर्गत विमा काढणे या सात योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची निकड लक्षात घेत महसूल प्रशासनातर्फे आयोजित कार्यशाळेत विविध योजनांची तसेच त्यांच्या अंमलबजावणी कार्यपद्धतीची सखोल माहिती उपस्थित कार्यकर्त्यांना देण्यात आली. कार्यशाळेत सहकार राज्यमंत्री दादा भुसे,अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी अजय मोरे आदींनी मार्गदर्शन केले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पवार, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अॅड. संजय दुसाणे, शहराध्यक्ष रामा मिस्तरी, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. तुषार शेवाळे, तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे आदी विविध पक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवताना सर्वसामान्यांना नाकीनऊ येते. योजनांसाठी कागदपत्रे जमविताना होणारी कुतरओढ तसेच सरकारी बाबूंचे असहकार्य यांसारख्या कारणांमुळे अनेकदा गरजू लोकांवर योजनांच्या लाभावर पाणी सोडण्याची वेळ येत असल्याचा अनुभव येतो. या पाश्र्वभूमीवर महसूल विभागातर्फे थेट लोकांमध्ये जात त्यांना योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी घेण्यात आलेला पुढाकार वाखाणण्याजोगा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
शासकीय योजनांविषयी कार्यशाळेद्वारे राजकीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 04-05-2016 at 01:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political workers guidance through workshop about government schemes