राज्य सरकारमधील मंत्रीच अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, बुवांमागे फिरणारे आणि हातात गंडेदोरे घालणारे मंत्री जोपर्यंत राज्य सरकारमध्ये आहेत तोपर्यंत जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान शेकाप प्रतोद पंडित पाटील यांनी केले. अलिबाग तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व अलिबाग तालुका विज्ञान अद्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूरच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पंडित पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आम्ही अंधश्रद्धेचे कधीही समर्थन केले नाही. कर्मकांडाना नेहमीच विरोध केला. श्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण त्याचाही अतिरेक होऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली. आपल्या भाषणात पंडित पाटील यांनी राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणावर हल्ला चढवला. घटनेचा मसुदा लिहिताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६ टक्के खर्च शिक्षणावर करावा असे म्हटले होते, परंतु सरकार अत्यल्प खर्च करते. गेल्या ६५ वर्षांत शिक्षण केवळ उच्चवर्णीय आणि मोठय़ा शहरांपुरतेच मर्यादित राहिले. अमेरिका सरकार संशोधनावर २५ टक्के खर्च करते. मोबाइलचा शोध १९६१ मध्ये लागला तो आपल्याकडे येईपर्यंत ४० वर्षे उलटून गेली. आपले सरकार अशा बाबींवर खर्च करीत नसल्याने आपण अजूनही मागे राहिलो. शिक्षण हक्क कायदा राबविताना त्याला आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे. विज्ञान प्रदर्शनासाठी जिल्हा परिषद निधीतून भरघोस तरतूद केली जाईल, अशी घोषणा पंडित पाटील यांनी केली.
जालंधर, पंजाब येथे झालेल्या कराटेच्या आंतरराष्ट्रीय कुमित फाईट या स्पर्धा प्रकारात कांस्यपदक पटकावणारा शहापूर हायस्कूलचा मृणाल घरत याचा पंडित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रायगड जिल्हाध्यक्ष नितीनकुमार राऊत यांनी विज्ञान व्याख्याते म्हणून अंनिसच्या कार्याची ओळख करून दिली. बालवयातच मुलांवर योग्य संस्कार झाले तर ते अंधश्रद्धेपासून दूर राहतील. यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी सांगितले. गट शिक्षणाधिकारी पी. ए. कोकाटे यांनी प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनामागची संकल्पना स्पष्ट केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, अलिबाग पंचायत समिती सभापती भारती थळे, उपसभापती अ‍ॅड. विजय पेढवी, सदस्या नीलिमा भगत, माजी सभापती अ‍ॅड. आस्वाद पाटील, गटविकास अधिकारी वीणा सुपेकर, शाळा समिती अध्यक्ष सुधीर थळे, शहापूरचे सरपंच महेंद्र पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील, तर आभार प्रदर्शन सुजाता चवरकर यांनी केले.

Story img Loader