विदर्भात उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. विदर्भातील बहुतेक शहरांसह तालुका आणि जिल्हास्तरावर उद्योगधंदे अद्यापही सुरू करण्यासाठी राज्यकर्त्यांनी पुढाकार घेतलेला नाही. केंद्र व राज्य शासनाने विदर्भातील शेतकऱ्यांना पॅकेज दिले तरीही विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. विदर्भाच्या मागासलेपणाला राज्यकर्तेच जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी येथे केला.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे यांचे प्रचारार्थ आमदार दरेकर शनिवारी स्थानिक विठ्ठलवाडी सभागृहात आयोजित मनसेच्या सभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, या मतदार संघाचे नेतृत्व शिवसेनेच्या भावना गवळी मागील १५ वर्षांंपासून करत आहेत. त्यांनी १५ वर्षांत त्यांच्या मतदार संघात कोणते भरीव कार्य केले आहे का? त्यांनी मतदारसंघातील सर्वसामान्यांसह गोरगरीब नागरिकांच्या मुलभूत समस्यांसुध्दा सोडवल्या नाहीत.
कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री. त्यांनी राज्यातील दीनदलितांचे तर सोडाच त्यांच्या आदिवासी समाजाचे कोणते कल्याण केले, असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला. या मतदार संघात कॉंग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार प्रस्थापित आहेत, तर मनसेने एका सामान्य कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली आहे. मनसेकडे पैसा, सत्ता आणि संपत्ती नसली तर सर्वसामान्यांचा जनाधार आहे. मनसेने राज्यात एकूण १० जागांवर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले आहेत. मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे विदर्भावर प्रेम आहे. विदर्भातून मनसेने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून राजू पाटील राजे यांना उभे केले आहे. सर्वसामान्यांच्या मुलभूत समस्या सोडवून मतदार संघाचा सर्वागीण विकास करण्यासाठी मतदारांना मनसेचा उमेदवारच सक्षम पर्याय असल्याचा दावा यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी केला. सभेच्या प्रारंभी मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे यांनी आपल्या मनोगतातून या मतदार संघातील प्रतिस्पर्धी प्रस्थापित उमेदवारांवर टीकास्त्र सोडले. यावेळी व्यासपीठावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, प्रा.विश्वनाथ सानप, सुनील मालपाणी, जिल्हा सचिव रणजित पाटील, डॉ.नारायण गोटे आदि उपस्थित होते. सभेचे संचालन मनविसेचे जिल्हाध्यक्ष आनंद गडेकर यांनी केले. त्यानंतर मनसेचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली वाशीम शहरामध्ये मनसेच्यावतीने दुचाकी रॅली काढण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा