रमेश पाटील

१५ मीटरच्या रुंदीकरणाला व्यापाऱ्यांचा विरोध; लोकप्रतिनिधींनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा स्थानिकांचा आरोप

वाडा शहरातून जाणाऱ्या पालघर-वाडा-देवगाव या राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आले असून त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली. मात्र रुंदीकरणावरून वाद सुरू झाला आहे. अंदाजपत्रकात १५ मीटर रुंदीकरणाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने १२ मीटर रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयावरून स्थानिक ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचे नेते संतप्त झाले आहे. लोकप्रतिनिधींनी व्यापारहित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.

वाडा बाजारपेठेतून जाणाऱ्या या राज्यमार्गाचे गेली अनेक वर्षे रुंदीकरण केलेले नाही. या रस्त्यालगत अनेक व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली. मात्र या मार्गावरून दररोज वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र रुंदीकरणामुळे अनेक व्यापाऱ्यांची दुकाने तोडावी लागणार असल्याने त्याला मोठय़ा प्रमाणात विरोध करण्यात आला. अंदाजपत्रकात या रस्त्याचे रुंदीकरण १५ मीटर करण्यात यावे, अशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र व्यापाऱ्यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांची भेट घेऊन रस्त्याची रुंदी १५ मीटरऐवजी १२ मीटर करण्याची विनंती केली. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण १२ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. वाडा शहरातील ९८ टक्के नागरिकांना विश्वासात न घेता तसेच भविष्यातील भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार न करता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार, आरपीआय, कुणबी सेना पक्ष संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, अभिलेखानुसार अस्तित्वात असलेला रस्ता १६ मीटरच रुंद व्हायला हवा, अशी मागणी जोर धरत असून रस्ता रुंदीकरणासाठी शहरात सह्य़ांची मोहीम राबवण्यात येणार आहे.

रस्ता रुंदीकरण अवघे १२ मीटर झाल्यास मंजूर अंदाजपत्रकानुसार प्रस्तावित बहुतेक सुविधा होऊ  शकणार नाहीत. वाढत्या लोकसंख्येनुसार आणि वाढत्या वाहन समस्यांनुसार पुन्हा काही वर्षांतच आजचीच गंभीर समस्या पुन्हा निर्माण होऊ  शकते. त्यामुळे धोके लक्षात घेऊन अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे काम होणे आवश्यक आहे.

– संदीप गणोरे, गटनेते, शिवसेना, नगरपंचायत, वाडा

वाडा शहरातील रस्ता हा शासनाच्या नियमानुसारच १६ मीटर व्हावा ही आमच्या पक्षाची भूमिका आहे.

– अमिन सेंदू, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, वाडा शहर

वाडा तालुक्याची लोकसंख्या सुमारे अडीच ते तीन लाख असून तालुक्यासाठी वाडा हीच मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे दिवसागणिक येथील वाहतुकीची समस्या बिकट बनणार आहे. रस्त्याचे योग्य रुंदीकरणाकरिता नागरिकांच्या सह्य़ांची मोहीम हाती घेणार आहोत.

– सचिन मुकणे, ग्रामस्थ

अभिलेखावरून व्यापाऱ्यांची बांधकामे अतिक्रमणे ठरत असून कोणताही लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी या अतिक्रमणला संरक्षण देऊ शकत नाही.

– अनंत सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते, वाडा

Story img Loader