राज्यात सत्तेत असणारे काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सध्या अंतर्गत धुसफूस, मंत्र्यांवरील गैरव्यवहारांचे आरोप यांसह इतर अनेक कारणांमुळे हैराण असून राज्यातील याच चित्राचे प्रतिबिंब उत्तर महाराष्ट्रातही दिसत आहेत. नाशिकमध्ये काँग्रेस शहराध्यक्षांविरूध्दचे बंड शमविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच जळगावमध्ये राष्ट्रवादीत खासदार ईश्वरलाल जैन यांच्याविरूध्द उठाव करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये स्थानिक कारणांतून असंतोषाची ठिणगी पडली असली तरी त्यामुळे उडालेला भडका मात्र दोन्ही पक्षांसाठी घातक ठरणारा आहे. दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी नेहमीप्रमाणे या प्रकरणांकडे ‘ठंडा करके खावो’ या पध्दतीने पाहात असून पक्षात बंड झाले म्हणून बंडखोरांवर तातडीने कारवाई होणे अशक्य आहे, तसेच त्यासाठी कारण ठरलेल्यांविरूध्दही.
दोन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्षपदी निवड झालेले आकाश छाजेड यांच्याविरूध्द पक्षातीलच एका गटाने केली जाणारी ओरड काही आजची नाही. पक्षात गटातटाचे राजकारण कायम असले तरी आकाश यांच्या निवडीनंतर पक्ष सरळ सरळ विभागला गेल्याचे दिसत आहे. जे कोणत्याही गटाचा उघडपणे पुरस्कार करू शकत नाहीत, त्यांची मात्र या घडामोडींमुळे पुरती गोची झाली आहे. त्यामुळे कधी इकडे तर कधी तिकडे असे त्यांचे सुरू असते. काँग्रेसच्या ‘दरबारी’ मंडळींमध्ये स्थान असणारे जयप्रकाश छाजेड यांचे पुत्र म्हणून आकाश यांच्यामागे उभे राहणाऱ्यांपैकी बहुतांश जणांची ‘केवळ नाईलाज’ ही भूमिका आहे. पक्षात कित्येक ज्येष्ठ नेते असताना त्यांना डावलून शहराध्यक्षपदी आकाश यांची निवड केल्यानंतर जाहीरपणे आम्ही कोणतीही भूमिका घेतली नाही, परंतु तरीही त्यांच्याकडूनच ज्येष्ठांचा मान राखला जात नाही, भेदभाव केला जात असल्याचे छाजेडविरोधी गटाचे म्हणणे आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जे कार्य सुरू केले, त्यास मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विरोधकांचा जळफळाट होत असल्याचे छाजेड म्हणतात. महापालिका निवडणुकीत काँग्रेसची या दुहीमुळेच प्रचंड घसरण झाली. त्यापासून कोणीच बोध घेताना दिसत नसून आता तर उघडपणे थेट प्रदेशाध्यक्षांकडेच ‘छाजेड हटाव, काँग्रेस बचाव’ असा विरोधकांनी टाहो फोडला आहे. अर्थात कोणत्याहीक्षणी मंत्रिमंडळ विस्तार होऊन त्यात समावेश होण्याची शक्यता असलेले माणिकराव ठाकरे सध्यातरी कोणत्याच गटाला दुखविण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांनी विरोधकांना आश्वासन देत वेळ निभावून नेण्याचे काम केले. त्यांच्या या भूमिकेने शहर काँग्रेसमध्ये पडलेली दरी विस्तारण्याचीच शक्यता अधिक.
जळगावात राष्ट्रवादीमध्येही हेच चित्र आहे. खासदार ईश्वरलाल जैन यांच्या कार्यपध्दतीविरोधात उघडपणे उठाव करीत विरोधी गटाने थेट त्यांचा खासदारकीचा राजीनामा घेण्यापासून तर त्यांना पक्षातून काढून टाकण्यापर्यंत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. जैन यांच्याविरूध्द याआधीपासूनच सुप्तावस्थेतील लाव्हा बाहेर पडण्यास कारण ठरली ती जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक. बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य असतानाही अध्यक्षपदी जैन यांच्या व्यूहरचनेमुळे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील निवडून आले. राष्ट्रवादीच्या पराभवास जैन हे कारणीभूत असल्याचा आरोप करीत मग त्यांना पक्ष कार्यालयात प्रवेश करण्यासही मज्जाव करेपर्यंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मजल गेली. पक्षांतंर्गत विरोधकांचा ‘लुंगेसुंगे’ असा उल्लेख करीत जैन यांनी आपल्यालेखी त्यांना कोणतीच किंमत नाही, हे दाखवून दिले. ही निवडणूक पक्ष म्हणून लढविण्यात आली नव्हती, असे जैन स्पष्ट करीत असले तरी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्याची किमया याआधी विधान परिषद निवडणुकीतही करून दाखविली आहे. केवळ स्थानिक मंडळी विरोधात गेली म्हणून जैन यांना पक्षातून काढले जाईल, हा समज खरोखरच भाबडा. कारण न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतही जिथे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना पाठीशी घालण्याचेच काम पक्षश्रेष्ठींकडून होत आहे, तिथे पक्षाच्या स्थानिक मंडळींच्या भावनेस कितीशी किंमत असेल ?   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा