सांगली बाजार समितीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा झालेला पराभव ही जिल्ह्याच्या राजकारणात परिवर्तनाची नांदी असल्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले. या निमित्ताने निर्माण झालेली राजकीय आघाडी पुढील निवडणुकीतही कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.
पत्रकार बैठकीस भाजपाचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, विशाल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, दिनकर पाटील यांच्यासह राष्ट्रवादीतून राजीनामा देऊन बाहेर पडलेले भानुदास पाटील हेही उपस्थित होते. तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणारी सांगली बाजार समिती जिल्ह्यातील महत्त्वाचे आíथक सत्ताकेंद्र असून जे आमच्याबरोबर आहेत त्यांना बाजूला व्हा असे सांगणार नाही, असे सांगत या विजयात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, विशाल पाटील यांच्यासह नाराज लोकांचेही मोलाचे योगदान असल्याचे डॉ. कदम म्हणाले.
शेतक-यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी आणि शेतकरी विकासासाठी बाजार समितीची सत्ता आवश्यक होती. ती आता मिळाली असून परिवर्तनाची नांदी या निमित्ताने दिसून आली. तासगाव, खानापूर, शिराळा या बाजार समितीत हे परिवर्तन दिसून आले असून सांगलीमध्ये एकतर्फी विजय मिळाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विकास सोसायटी गटात केवळ दोन जागा जयंत पॅनेलला मिळाल्या असल्या तरी त्या तांत्रिक चुकीमुळे मिळाल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
मदन पाटील यांच्याबाबत डॉ. कदम म्हणाले की, आम्ही नांदवायला तयार आहे मात्र, नांदणारीचीच इच्छा महत्त्वाची आहे. सांगली महापालिकेतही आपण लक्ष घालणार असून स्थायी सदस्य निवडीपूर्वी नावे शहर जिल्हाध्यक्ष गटनेत्याला देतील. यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. याशिवाय प्रत्येक प्रभागात किती रक्कम खर्ची टाकण्यात आली याची माहिती आपण मागविली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. घोरपडे म्हणाले की, बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेला समूह लोकांना रुचला नाही. यामुळेच मतदारांनी परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला. लोकसभेवेळी लोकांनी भरभरून मताचे दान दिले मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाल्यानेच हा पराभव लेकांनी केला आहे. वेगवेगळ्या लोकांना एकत्र करून केलेल्या आघाडीचा विचार लोकांनी झिडकारला असल्याचे सांगत अप्रत्यक्ष आ. जयंत पाटील व खा. संजयकाका पाटील यांच्यावर श्री. घोरपडे यांनी टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा