देशाला पूर्ण वेळ संरक्षणमंत्री नसल्याने राष्ट्राच्या सुरक्षिततेशी खेळ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या सुरक्षिततेची चिंता नसून, पाकिस्तानचे हल्ले सुरू असताना ते महाराष्ट्रात राजकारण करत बसलेत. देशात अच्छे दिन आनेवाले है, असे म्हणणारे महाराष्ट्रात गप्प का, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
कराडनजीकच्या मलकापूर येथे प्रचार सभेत ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, मनोहर शिंदे, चित्रलेखा माने यांची उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, की  लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणारा भाजप महाराष्ट्रात मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासंदर्भात मौन बाळगून असून, नरेंद्र मोदी हे रिमोट कंट्रोलने महाराष्ट्र चालवणार आहेत का? कराड दक्षिण हा फुले, शाहू, आंबेडकरांचा वसा जोपासणारा यशवंत विचारांचा पवित्र मतदारसंघ असल्याने येथे जातीयवाद्यांना कदापि थारा मिळणार नसल्याचा विश्वास त्यांनी दिला. १०० दिवसांत मोदी सरकारने निराशाजनक कामगिरी केली आहे. महाराष्ट्राची दिशाभूल करून, गुजरातचा विकास करण्याचा छुपा अजेंडा त्यांचा आहे. येथील सागरी सुरक्षा अ‍ॅकॅडमी गुजरातला हलविण्यात आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील उद्योजकांना गुजरातमध्ये येण्याचे आवाहन करत आहेत. नरेंद्र मोदींनी देशात परकीय गुंतवणुकीसाठी परदेश दौरे करावे लागत आहेत. महाराष्ट्रात मात्र उद्योजक स्वत:हून कोटय़वधींची गुंतवणूक करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कराड दक्षिण ही माझी कर्मभूमी असून, येथून विधानसभेवर जाण्याची इच्छा आपण पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली. येथील जनतेने नेहमीच काँग्रेस विचाराला साथ केल्याने येथे जातीयवादी विचार स्पर्शही करू शकणार नसल्याचे ते म्हणाले. मनोहर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा