महाराष्ट्राचे लोकनेते वसंतदादा पाटील यांची जन्मशताब्दी सुरू झाली असतानाच दादांच्या घराण्यातील वादाने वेगळे वळण घेतले आहे. वसंतदादा राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना स्थानिक पातळीवर राजकीय वारस म्हणून विष्णुअण्णा पाटील यांच्याकडे सूत्रे सोपविली होती. वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांची राजकीय महत्त्वाकांक्षा हा नेहमीच चर्चेचा विषय होता. दादांचे चिरंजीव प्रकाशबापू पाटील राजकारणात सक्रिय झाल्यावर घरातच वारसा विभागला गेला. विष्णुअण्णा पाटील आणि प्रकाशबापूंमधून विस्तवही जात नव्हता. साखर कारखाना विष्णुअण्णांकडे तर खासदारकी प्रकाशबापूंकडे असा समन्वय दादांनी साधला. घरातील संघर्ष उंबरठय़ाच्या बाहेर येणार नाही, अशी सावधगिरी दादांनी बाळगली होती. या दोघांच्या वादात शालिनीताईंच्या प्रवेशाने तिसरी किनार लाभली.
दादांनी उभ्या केलेल्या कारखान्यात संधी मिळणार नाही हे लक्षात येताच ताईंनी जरंडेश्वर साखर कारखान्याची उभारणी करीत राजकारणासाठी कोरेगावचे क्षेत्र निवडले. यातून दादा घराण्यातील तिसरा कोन जास्त ताणला गेला नाही हे वास्तव. कारखान्याच्या समोर असणाऱ्या बंगल्याचे नावही शालिनी असले तरी लोकांच्या विस्मृतीत आता हे नाव गेले आहे की घालवले हा संशोधनाचा विषय ठरावा. सांगलीच्या राजकारणात मदन पाटील यांचे नेतृत्व उदयास आले तसे तरुण रक्ताच्या कार्यकर्त्यांची एक फळी दादा घराण्याशी जोडली गेली. ही फळी कायम सोबत राहील याची दक्षता मदन पाटील यांनी घेतली. या कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ देण्यापासून कार्यकर्त्यांची गर्दी कायम राहील याची दक्षता मदन पाटील यांनी घेतली.
इकडे दादा घराण्यातील भाऊबंदकीतून विष्णुअण्णा पाटील यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये दोन वेळा सांगलीत पराभव झाला. यामागे दादा घराण्यातील सत्तासंघर्षच कारणीभूत ठरला होता. दादांच्या विचाराचा वारसा कितपत जोपासला जातो आहे हे पाहण्यासाठी सध्या दुर्बिणीची गरज असली तरी मतभेदांचा वारसा कायमपणे जोपासण्याची दादांच्या हयातीत असलेली परंपरा आजही कायम आहे. दिल्लीचे तख्त, कारखाना थोरल्या पातीकडे म्हणजे दादांच्या थेट वारसाकडे आणि व महापालिका धाकटय़ा पातीकडे चुलत घराण्याकडे अशी अलिखित विभागणी झाली.
मात्र एकमेकांच्या सत्तास्थानावर आक्रमण करण्याच्या नादात आणि आपली सत्तालालसा जोपासण्याच्या अभिलालसेपोटी सुप्त संघर्ष सुरूच राहिला. प्रकाशबापूंचे चिरंजीव प्रतीक आणि विशाल या दोघांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. दादांचा नातू म्हणून काँग्रेसने सांगलीतून प्रतीक पाटील यांना उमेदवारी दिली. २००९च्या निवडणुकीत सांगलीची जागा धोक्यात असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यात आलेल्या काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यातील नेत्यांना सांगलीकडे लक्ष देण्याची सूचना केली होती. पुढे प्रतीक यांना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाले, पण मंत्रिपदाचा राजकीय उपयोग त्यांना करता आला नाही.
सध्या राजकारणात दादांची तिसरी पिढी सक्रिय झाली असताना नवे आयाम लाभत आहेत. मदन पाटील यांच्या निधनानंतर हा गट आजही थोरल्या पातीपेक्षा (प्रतीक किंवा विशाल) बाजार समितीजवळ असलेल्या विजय बंगल्याशी आपल्या निष्ठा ठेवून आहे. मदन पाटील यांना दोन्ही मुलीच असल्याने वारसाचा निर्माण झालेला तिढा सोडवीत असताना कदम गटाचा शिरकाव लग्नाच्या निमित्ताने होत असून यामुळे नवे राजकीय समीकरण उदयाला आले तर नवल वाटणार नाही. मदन पाटील यांची दुसरी मुलगी मोनिका हिचा विवाह रविवारी आमदार मोहनराव कदम यांचे चिरंजीव जितेश यांच्याशी होत आहे. यामुळे हा सत्तासंघर्ष आता तीव्र होणार की उंबरठय़ाच्या आतच राहणार हे स्पष्ट होण्यासाठी पुढील निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे.
नवे समीकरण उदयाला
वसंतदादा पाटील यांची जन्मशताब्दी सुरू झाली असतानाच दादांच्या घराण्यातील वादाने वेगळे वळण घेतले आहे. सध्या राजकारणात दादांची तिसरी पिढी सक्रिय झाली असताना नवे आयाम लाभत आहेत. मदन पाटील यांच्या निधनानंतर हा गट आजही थोरल्या पातीपेक्षा (प्रतीक किंवा विशाल) बाजार समितीजवळ असलेल्या विजय बंगल्याशी आपल्या निष्ठा ठेवून आहे. मदन पाटील यांना दोन्ही मुलीच असल्याने वारसाचा निर्माण झालेला तिढा सोडवीत असताना कदम गटाचा शिरकाव लग्नाच्या निमित्ताने होत असून यामुळे नवे समीकरण उदयाला आले तर नवल वाटणार नाही.