तिकीट इच्छुकांचा मेळावा म्हणजे राजकारण, असा प्रचलित राजकारणाचा अर्थ झाला आहे. त्यामुळे समाजकारण, राष्ट्रकारण व विकासकारण यांचा अर्थ समजावून घेऊन राजकारणाची परिभाषा बदलणे गरजेचे आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
विद्या सहकारी बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘विद्या व्यास पुरस्कारां’चे वितरण गडकरी यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. गोरख देगलूरकर, डॉ. के. एच. संचेती व डॉ. सदानंद देशमुख यांना ज्येष्ठ शिक्षक पुरस्काराने, तर डॉ. देवदत्त पाटील, उज्ज्वला गायकवाड, सुधाकर जगदाळे यांना ‘तरुण शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. बँकेच्या अध्यक्षा व आमदार माधुरी मिसाळ, आमदार गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, भीमराव तापकीर, लोकमत समूहाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर, बँकेचे कार्यकारी संचालक विद्याधर अनास्कर, उपाध्यक्ष आनंद क्षीरसागर आदी त्या वेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले,‘‘चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान व वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही. सरकारकडूनही हे होते आहे. मात्र, समाजात आजही चांगले काम करणारी माणसे आहेत. त्यामुळे समाज पुढे जातो आहे. ज्ञानाबरोबरच संस्कारित व्यक्ती तयार होणार नसतील, तर भौतिक विकासाचा उपयोग नाही. राजकारण, समाजकारण, अर्थकारणात शॉर्टकट घेणारे उद्ध्वस्त होतात. या क्षेत्रात प्रामाणिकता, संस्कारांचे मोठे भांडवल गरजेचे आहे.
राजकारण्यांबाबत ते म्हणावे,‘‘राजकारणी लोक कद्रू झाले आहेत. कोणीही एकमेकांविषयी चांगले बोलत नाही. त्यामुळे समाजातील सर्वच क्षेत्रात गुणात्मक परिवर्तनाची गरज आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘..अन् बातम्या छापण्यासाठी पैसे घेता’
समाजात सर्वच क्षेत्रात गुणात्मक परिवर्तनाची गरज असल्याचे सांगताना नितीन गडकरी यांनी ‘पेड न्यूज’चे उदाहरण दिले. ते म्हणाले,‘‘अग्रलेखातून मार्गदर्शन केले जाते, मात्र निवडणुकांमध्ये बातम्या छापण्यासाठी प्रतिकॉलम सेंटिमीटरनुसार पैसे घेतले जातात.’’ या वाक्यानंतर गडकरींनी काहीसे सावरून घेतले व मी राज्यातल्या कोणाबद्दलही हे बोलत नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.