हर्षद कशाळकर
अलिबाग- मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून सध्या राजकारण तापले आहे. महामार्गाच्या प्रश्नावरून सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या ११ वर्षांपासून रखडले आहे. पळस्पे ते इंदापूर या मार्गाची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत.
सुरुवातीला पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप अशा दोन टप्प्यांत रस्त्याचे काम केले जाणार होते. आता मात्र पळस्पे ते कासू, कासू ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप अशा तीन टप्प्यांत हे काम केले जाणार आहे. यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांचा अपवाद वगळता, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ता चौपदरीकरणाची कामे रखडली आहेत. त्यामुळे राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कासू ते इंदापूर मार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले होते. या कामासाठी चारशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. निविदा प्रक्रियाही झाली. मात्र भूमिपूजनाला वर्ष पूर्ण होत आले तरी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकली नाही. सुरुवातीला हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची कारणे पुढे केली गेली. न्यायालयीन अडचण दूर झाल्यावर कामाला सुरुवात होईल, असे सांगितले गेले. ही अडचण दूर झाली तरी रस्त्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे नागरिकांसह आमदारही संतापले आहेत.
विधानसभेत पडसाद
नुकतेच याचे तीव्र पडसाद विधानसभेतही उमटल्याचे पाहायला मिळाले होते. महामार्गाचे काम अनेक वर्षे प्रलंबित आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र रस्त्याच्या कामात प्रगती होताना दिसत नाही. गणेशोत्सव, शिमगा आला की रस्त्यावरून चर्चा होते. तात्पुरती दुरुस्ती केली जाते; पण रस्त्याचे काम मार्गी लागत नाही. रोज अपघात होत आहेत. ज्यामुळे लोकांचे जीव धोक्यात येत असल्याचा मुद्दा आमदारांनी या वेळी उपस्थित केला. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामातील तांत्रिक अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला; पण आमदारांचे समाधान झाले नाही. एकूणच रस्त्याच्या कामावरून कोकणातील आमदार आक्रमक झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले. आश्वासने नको, आता रस्ता पूर्ण कधी होणार ते सांगा, अशी भूमिका या वेळी त्यांनी मांडली.
कामाची सद्य:स्थिती गोव्यापासून राजापूपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा लहानसा भाग सोडला तर उर्वरित काम मार्गी लागले आहे; पण रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात रस्त्याची कामे रखडली आहेत. पळस्पे ते कासू मार्गाचे चौपदरीकरण पुर्ण झाले असले तरी काँक्रीटीकरणाचे काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्य वळण रस्त्याची कामे रखडली आहेत. कासू ते इंदापूर मार्गाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम मंजूर होऊनही सुरू झालेले नाही. रत्नागिरीत परशुराम घाटात तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे कामात अडचणी येत आहेत. तो रस्ता बंद करून काम करणे कठीण होत आहे.
या कामावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठण व्हायला हवे. या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा समावेश असावा. दर तीन महिन्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जावा तरच महामार्गाचे काम मार्गी लागू शकेल. राज्य सरकारला मर्यादित अधिकार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडे यासाठी पाठपुरावा व्हायला हवा.
-आदिती तटकरे आमदार
साडेसातशे किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम चार वर्षांत पूर्ण होते; पण नऊ वर्षे झाली तरी मुंबई-गोवा महामार्गाचे साडेपाचशे किलोमीटरचे काम पूर्ण होऊ शकत नाही. अशा पद्धतीने काम होणार असेल तर महाराष्ट्रात रस्त्यांची कामे कशी पूर्ण होणार? आश्वासने खूप झाली, आता रस्ता कधी पूर्ण होणार हे शासनाने जाहीर करायला हवे.
-अमित साटम, आमदार