गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांत मी ३० वर्षांचे अंतर पार केले. मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव चच्रेत आहे. मी होईल का, माहीत नाही. मात्र, मुख्यमंत्री बनवण्याची ताकद मुंडे नावात आहे, हे मी सिद्ध केले. मी घेतलेला निर्णय कोणाला विचारायची गरज नाही. त्यामुळे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याची खात्री बाळगा, असे सांगतानाच मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करणारे राष्ट्रवादीचे पवार वा त्यांचा एकही आमदार भेटायला आला नाही. उलट मला अडविण्यासाठी परळीत ताकद लावली. मात्र, बारामतीत जाऊन प्रचार सभा घेणार आहे. दुटप्पी वागणाऱ्या लोकांना जनताच उत्तर देईल, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
येथे सलीम जहाँगीर यांच्या वतीने मुस्लिम समाजाचा परिवर्तन मेळावा पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. उमेदवार विनायक मेटे, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, नितीन कोटेचा उपस्थित होते. पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या पवार काका-पुतण्यांवर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी मुंडेंच्या अंत्यविधीला का आले नाहीत, असा प्रश्न विचारणाऱ्या पवार काका-पुतण्या वा खासदार सुप्रिया सुळे भेटायला आल्या नाहीत. जिल्हय़ातील राष्ट्रवादीचा एकही आमदार भेटायला आला नाही. त्यांना कोणी अधिकार दिला, असा प्रतिसवाल करून मृत्यूनंतरही पवारांनी शत्रुत्व कायम ठेवले. लोकसभेत उमेदवार न देणाऱ्या पवारांनी परळीत मात्र मला अडविण्यासाठी ताकद लावली. मात्र, मीही बारामतीत प्रचार करून राष्ट्रवादीला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही. दुटप्पी वागणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जनताच उत्तर देईल, असा हल्ला त्यांनी चढविला.
संघर्ष यात्रेत लोकांनी डोक्यावर घेतले. चार हजार किलोमीटरचा प्रवास करून राज्य जाणून घेतले. मोदी, अमित शहा जिल्हय़ात आले. विकासासाठी मी घेतलेला निर्णय कोणाला विचारायची गरज नाही. त्यासाठी जिल्हय़ातील जनतेने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मुस्लिम समाजाने मुंडे यांच्यावर प्रेम केले. त्यांच्या निधनाच्या धक्क्याने एक मुस्लिम तरुण मृत्युमुखी पडला. या समाजाला मुख्य प्रवाहात घेऊन जाण्यास आपण प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी दिला.

Story img Loader