ग्रामीण भागाच्या विकासात मोलाची भर घालत असल्याचा दावा जिल्ह्यातील साखर कारखाने करीत असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना ठोठावलेल्या दंडामुळे त्यांच्या पर्यावरण विषयक उत्तरदायित्वाचा पर्दाफाश झाला आहे. पंचगंगा दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी या नद्यांच्या प्रदूषण प्रक्रियेने ११ कारखान्यांना ८५ लाखांचा दंड प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोठावला असून या रकमेची बँक हमी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा व सांगली जिल्ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे.
ग्रामीण भागाच्या विकासामध्ये साखर कारखान्यांचे मोठे योगदान आहे असे कारखान्याचे पदाधिकारी सतत दावा करीत असतात. ग्रामीण विकासाला साखर कारखान्यांचा हातभार लागत असला तरी प्रदूषणाबाबत मात्र कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासलेली नसल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा, हिरण्यकेशी या नद्यांच्या प्रदूषण प्रक्रियेने ११ कारखान्यांना नाहरकत प्रमाणपत्राचे उल्लंघन केले असल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षांतील प्रदूषणकारी घटकांच्या अहवालाची तपासणी केली असता अनेक गंभीर मुद्दे पुढे आले आहे. यासंदर्भातील अहवाल राज्य शासनाने नियुक्त केले. नदीप्रदूषणविषयक उपसमितीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना सादर केला आहे. याआधारे खासगी-दत्त दालमिया (आसुल्रे-पोल्रे) व रेणुका-पंचगंगा (इचलकरंजी) या कारखान्यांसह सहकारातील कुंभीकासारी, राजाराम साखर कारखाना, दत्त साखर कारखाना, डॉ. डी.वाय पाटील साखर कारखाना, भोगावती कारखाना,जवाहर, तात्यासाहेब कोरे वारणा कारखाना, आप्पासाहेब नलवडे-गडिहग्लज कारखाना यांची ५ लाखांची बँक हमी जप्त केली आहे. गगनबावडा तालुक्यातील ओरिएंटल ग्रीन पॉवर या कंपनीने सहवीज प्रकल्पातून हवेचे प्रदूषण केल्याप्रकरणी त्यांचीही ५ लाखांची हमी जप्त केली आहे. याशिवाय राजारामबापू सहकारी साखर काखाना, यांची तीन लाखांची बँक हमी जप्त केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या प्रमाणपत्राचे उल्लंघन होत असल्याने उत्पादन का करू नये अशी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2015 रोजी प्रकाशित
साखर कारखाने ठरतायेत प्रदूषणाचे स्रोत
ग्रामीण भागाच्या विकासात मोलाची भर घालत असल्याचा दावा जिल्ह्यातील साखर कारखाने करीत असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना ठोठावलेल्या दंडामुळे त्यांच्या पर्यावरण विषयक उत्तरदायित्वाचा पर्दाफाश झाला आहे.

First published on: 08-03-2015 at 02:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution in sugar factory