गैरव्यवहारांच्या आरोपांवरून सध्या चौकशी सुरू असलेले अनेक बडे नेते मला भेटायला येतात. ते मला एसआयटी (विशेष तपास पथक) आणि अन्य संस्थांकडून सुरू असलेली चौकशी थांबविण्याची विनवणी करतात, असा गौफ्यस्फोट करून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. नगरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबद्दलचा उल्लेख केला. मात्र, आम्ही या नेत्यांच्या मागणीला भीक घालणार नाही आणि सर्व चौकश्या निपक्ष:पातीपणे सुरू ठेवू, असे आश्वासनही पाटील यांनी यावेळी दिले. मला भेटायला आलेल्या या नेत्यांना मी सांगतो की, हे चौकशी करण्याचे सर्व प्रकार तुमच्याच काळात सुरू झाले होते. त्यानंतर तुम्ही ते तसेच प्रलंबित ठेवले असले तरी आम्ही या सगळ्याचा निकाल लावणार आहोत. सध्या सिंचन गैरव्यवहार आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या अजित पवार, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ यांची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य सूचक मानले जात आहे. सहकार कारखाने, जिल्हा बँक आणि सूत गिरण्यांमध्ये घोटाळा करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. त्यांची चौकशी होणारच असे बजावत आता चुकीच्या गोष्टी विसरा असा, इशाराही पाटील यांनी दिला . दूध का दूध आणि पानी का पानी होऊ द्या, सहकार संपवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा