वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. त्यांच्या आई मनोरमा यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केली अटक

मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पौड येथील फौजदारी न्यायालयामध्ये आणण्यात आलं. न्यायालयात सरकारी वकील आणि आरोपींचे वकील यांनी आपली बाजू मांडल्या नंतर न्यायालयाने आपला निकाल दिला. एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवतानाचा मनोरमा यांचा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर नाट्यमयरित्या त्यांना अटक करण्यात आली. एका हॉटेलमध्ये त्या इंदुबाई या नावाने राहात होत्या.

नेमकी कशी अटक करण्यात आली?

वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांना पुणे पोलिसांनी किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी मधून अट केली. मनोरमा या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती हॉटेलमध्ये राहात होत्या. इंदुबाई ढाकणे हे नाव त्यांनी हॉटेलमध्ये दिलं होतं. तसंच या नावाचं बनावट आधारकार्डही त्यांनी दाखवलं. त्यांच्याबरोबर जी व्यक्ती होती त्यांनी त्यांचं नाव दादासाहेब ढाकणे असल्याची माहिती हॉटेल मालकाला दिली होती.

हे पण वाचा- मनोरमा खेडकर यांच्याकडून पोलीस, मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी; आणखी एक चित्रफीत प्रसारित

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोरमा खेडकर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या व्यक्ती रायगड येथील पार्वती हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी पहाटे अडीचला छापा मारला. त्यानंतर त्यांनी इंदुबाई ढाकणे उर्फ मनोरमा खेडकर यांना अटक केली. मेडिकल चाचणीनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.

मनोरमा खेडकर यांना अटक, इंदुबाई हे नाव वापरुन रायगडच्या पार्वती हॉटेलमध्ये वास्तव्य

मनोरमा खेडकर कशामुळे चर्चेत आल्या?

ऑडी गाडीवर लाल रंगाचा अंबर दिवा लावल्याने चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांच्यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून नवनवीन खुलासे समोर येत आहेत. लाल दिव्याबरोबरच प्रशिक्षणार्थी असताना कार, स्वीय सहाय्यकासह वेगळ्या केबिनसाठी मागणी केल्याचे पूजा यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यक्तीबरोबरचे व्हॉट्सअप चॅट समोर आले. त्यातच दिव्यांग म्हणून मिळालेलं प्रमाणपत्रही वादात सापडलं. तसेच वडिलांची संपत्ती ४० कोटींहून अधिक असताना पूजा यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं यासारखे प्रश्न उपस्थित करण्यात आले. असं असतानाच कारवाईसाठी पूजा यांच्या पुण्यातील घरी पोहोचलेल्या पोलिस आणि अधिकाऱ्यांचं वार्तांकन करायला गेलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींबरोबर पूजा यांच्या आईने उद्धट वागणूक दिल्याने त्या सुद्धा चर्चेत आल्या. त्या चर्चेत आल्यानंतर त्यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला. यामध्ये त्या जमिनीच्या वादावरुन मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकावत असल्याचं दिसून आलं होतं. याच प्रकरणात पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.