आयएएस पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या वर्तनामुळे व त्यानंतर त्यांच्या कागदपत्रांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांमुळे चर्चेत आल्या आहेत. मात्र, आता त्यांचे वडिल दिलीप खेडकर यांनी पूजा यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एवढंच नाही, तर पूजा यांनी त्यांच्या गाडीवर लावलेला अंबर दिवा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून लावला होता, असा दावाही त्यांनी केला आहे. या सर्व प्रकरणात आयएएस पूजा खेडकर यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करतानाच दिलीप खेडकर यांनी त्या रुजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं? याबाबत घटनाक्रमाचा दावा केला आहे.
दिलीप खेडकरांशी आपला फारसा संबंध राहिला नसल्याचं पूजा खेडकर यांनी मॉक इंटरव्यूमध्ये सांगितलं होतं. मात्र, त्यांच्यासाठी दिलीप खेडकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यामुळे यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत. दिलीप खेडकरांनी या सर्व प्रकरणावर न्यूज १८ लोकमतशी बोलताना त्यांची भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले दिलीप खेडकर?
“पूजा ३ जून रोजी रुजू झाली. दुसऱ्या दिवशी मतमोजणी होती. ४ जूनला तिला मतमोजणीच्या ठिकाणी सकाळी ६ वाजता यायला सांगितलं. जाताना तिनं सहाय्यक मतदान अधिकाऱ्यांना तिला सोबत घेऊन जाण्याविषयी विनंती केली. पण त्यांनी त्याला नकार दिला. तिथे जाणं आवश्यक असल्यामुळे पूजानं तिच्या नातेवाईकाकडे असणारी गाडी तिथे नेली. पण मतदान केंद्रावर मोठा बंदोबस्त असतो. तिला २ किलोमीटर मागे अडवलं आणि गाडी नेता येणार नाही असं सांगितलं. पूजानं अधिकारी असल्याचं सांगितल्यानंतर ‘तुमच्या गाडीवर तसं काही लिहिलं नाही’ असं तिला सांगण्यात आलं”, असा दावा दिलीप खेडकर यांनी केला आहे.
“…शेवटी पूजा लिफ्ट मागून पूजा खेडकर गाडीपर्यंत पोहोचली”
“ती गाडी तिथेच पार्क करून पूजानं सहायक महिला निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करून हा प्रकार सांगितला. त्यांनी पूजाला सांगितंल की मी काहीतरी करते. पण नंतर त्यांचा फोन स्वीच ऑफ झाला होता. शेवटी पूजा चालत मतमोजणी केंद्रावर पोहोचली. संध्याकाळी परत येतानाही तेच झालं. नाईलाजाने ती कुणाकडेतरी लिफ्ट मागून तिच्या गाडीपर्यंत पोहोचली”, असं ते म्हणाले.
IAS पूजा खेडकर यांच्यावर LBSNAA ची मोठी कारवाई; जारी केले ‘हे’ आदेश; राज्य सरकारनंही पाठवलं पत्र!
“जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून अंबर दिवा लावला”
“५ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तिने हे सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रवास भत्त्यामध्ये तू स्वत:ची गाडी किंवा भाड्याची गाडी घे. त्या गाडीवर महाराष्ट्र शासन आणि लाल दिवा लावला तर तुला अडचण येणार नाही असं त्यांनी सांगितल्यामुळे पुढच्या गोष्टी घडल्या. तिनं जर हे स्वत:च्या मनानं केलं असतं तर जिल्हाधिकाऱ्यांनी हे चुकीचं असल्याचं पत्र द्यायला हवं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या खासगी गाड्यांवर अंबर दिवा असतो. संपूर्ण महाराष्ट्रात हे चित्र दिसतं. त्यामुळे तिने काही वेगळं केलेलं नाही”, अस दिलीप खेडकर म्हणाले.
“माझ्यासमोर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी तिला…”
“प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला केबिन दिलं जाऊ नये असा कुठलाही नियम मला दाखवा, मी माझ्या मुलीला उद्याच राजीनामा द्यायला सांगतो. जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनीच केबिनमध्ये तिचं सामान लावलं. माझ्याकडे फोटोही आहेत. मी स्वत: तिथे गेलो असता माझ्यासमोर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी तिला त्यांच्या केबिनमधल्या अँटि चेंबरमध्ये तिचं सामान ठेवायला सांगितलं. ‘तुझं हे स्वतंत्र केबिन होईल’, असं त्यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांना तिचं सामान लावून घ्यायला सांगितलं.अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रार पत्रातही टेबल लावण्याची परवानगी दिल्याचं म्हटलं आहे”, असं दिलीप खेडकर यांनी नमूद केलं आहे.
“यशदाच्या डीजींकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यांनीच जिल्हाधिकारी कार्यालयात तिला बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर तिने महसूल विभागाच्या आयुक्तांनाही हे सगळं सांगितलं होतं. त्यांनी यात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं होतं”, असंही ते म्हणाले.