Pooja Khedkar Bail Plea Hearing: गेल्या महिन्याभरात IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भात पूजा खेडकर यांनी दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी चालू आहे. या सुनावणीदरम्यान, पूजा खेडकर यांनी दाखल केलेल्या अर्जावर दिल्ली पोलीस व यूपीएससी यांच्याकडूनही युक्तिवाद सादर करण्यात आला. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी निकाल येण्याची शक्यता आहे. यावेळी पूजा खेडकर यांच्यावतीने वकील बिना माधवन यांनी आक्रमक युक्तिवाद केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं प्रकरण काय?

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याचा ठपका पूजा खेडकर यांच्यावर आधी ठेवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. पुढे पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय, त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमी लेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यासाठी त्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी याचबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा उल्लेख न्यायालयातील सुनावणीमध्ये करण्यात आला.

पूजा खेडकर यांचा युक्तिवाद काय?

पूजा खेडकर यांच्यावतीने आज वकील बिना माधवन यांनी आक्रमक युक्तिवाद केला. “आम्ही अंतरिम जामीनासाठी अर्ज केला आहे. माझ्यावर कलम ४२०, ४६४, ४६५ नुसार आरोप करण्यात आले आहेत. माझ्यावर अटकेसाठी दबाव टाकला जात आहे. यूपीएससीकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये मी मुभा असलेल्या मुदतीपेक्षा जास्त वेळा यूपीएससी परीक्षेला बसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पण हे चुकीचं आहे”, असं पूजा खेडकर यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आलं.

“मी कोणत्याही प्रकारची माहिती लपवलेली नाही. मी फक्त चुकून परीक्षेला किती वेळा बसले याबाबत चुकीचा उल्लेख केला आहे”, असा युक्तिवादही पूजा खेडकर यांच्यावतीने करण्यात आला आहे.

“८ डॉक्टरांनी दिलेला अहवाल चुकीचा कसा?”

दरम्यान, पूजा खेडकर यांच्यावतीने एम्सकडून त्यांना देण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राचा दाखला देण्यात आला. “मला एम्सच्या ८ डॉक्टरांच्या टीमकडून दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. त्यानुसार माझ्या दिव्यंगत्वाचं प्रमाण ४७ टक्के इतकं आहे”, असा दावाही पूजा खेडकर यांच्यावतीने वकील बिना माधवन यांनी कोर्टात केला.

पूजा खेडकर यांना केंद्र शासनाच्या कर्मचारी, प्रशिक्षण विभागाकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस

“दिल्ली पोलीस म्हणतात त्यांना चौकशीसाठी माझी कोठडी हवी आहे. पण मला स्वत:चा बचाव करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जायला हवा. त्यांनी अशा प्रकारे ही सगळी कारवाई का केली आहे? मला अनेक प्रकारच्या संस्थांनी चौकशीसाठी बोलवलं आहे. मसूरीतील अकादमीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. पुण्याच्या आयुक्तांनीही बोलवलं आहे. कार्मिक विभागानंही मला नोटीस पाठवली आहे”, असा युक्तिवाद पूजा खेडकर यांच्यावतीने करण्यात आला आहे.

“…म्हणून मला लक्ष्य केलं जात आहे”

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्यामुळेच माझ्याविरोधात कारवाई केली जात असल्याचं पूजा खेडकर यांनी न्यायालयात सांगितलं. “पूजा खेडकर या फायटर आहेत. त्यांनी उमेदवारी वैध ठरवण्यासाठी प्रत्येक स्तरावर संघर्ष केला आहे. एखाद्या दिव्यांग व्यक्तीसाठी हे आयुष्य सोपं नाही”, असं पूजा खेडकर यांच्या वकील बिना माधवन युक्तिवादावेळी म्हणाल्या.

“पूजा खेडकर यांच्या पालकांचा घटस्फोट झाला आहे. त्या स्वत: दिव्यांग आहेत. आणि आता त्यांना ज्या व्यवस्थेनं संरक्षण द्यायला हवं, त्याच व्यवस्थेनं त्यांना असहाय केलं आहे. यूपीएससी त्यांच्याविरोधात हे सगळं का करत आहे? त्या एक महिला आहेत म्हणून? की त्या एक दिव्यांग आहेत म्हणून?” असे सवाल बिना माधवन यांनी न्यायालयात उपस्थित केले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja khedkar ias interim bail plea patiala high court to give verdict pmw