IAS पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवल्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. मात्र, आता त्यांनी आयएएसमध्ये निवड होण्यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रांवरूनही वाद निर्माण झाला आहे. त्यांनी चुकीची कागदपत्र सादर केल्याचा आरोप असून त्याची चौकशी चालू आहे. त्यातच आता त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असून त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात पौड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हातात पिस्तुल, गावकऱ्यांवर दमदाटी

पूजा खेडकर वादात सापडल्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या एका शेतात हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचं दिसत आहे. शिवाय, यावेळी मनोरमा यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षकदेखील होते. जमिनीच्या मालकीहक्कावरून वाद झाल्यानंतर मनोरमा खेडकर थेट हातात पिस्तुल घेऊन त्या शेतकऱ्यांना धमकावू लागल्या. त्यांच्या आयएएस मुलीचं वर्तन चर्चेचा विषय ठरल्यानंतर त्यांच्या आईचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

पूजा खेडकर यांची ऑडी कार जप्त करण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी गेले असता त्यांच्याशीही मनोरमा खेडकर या अरेरावीने बोलत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर हातात पिस्तुल घेतलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला. ही घटना घडली, तेव्हा यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, आता या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आईसोबतच वडिलांचंही FIR मध्ये नाव!

पौड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मनोरमा खेडकर, त्यांचे पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर व इतर चार जणांची नावं आहेत. शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. मनोरमा खेडकर यांनी धमकावल्याची तक्रार काही स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला असून त्यात कलम ३२३, ५०४. ५०६ नुसार नोंद करण्यात आली आहे. यामध्ये शस्त्रास्र कायद्याची कलमंही समाविष्ट करण्यात आल्याची माहिती पौड पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.

आता IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा चर्चेत; गावकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावतानाचा Video व्हायरल!

IAS पूजा खेडकर चर्चेत का?

पूजा खेडकर या २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांचं LBSNAA मधील एक वर्षाचं प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांना प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून बुलढाण्याला नियुक्ती मिळाली होती. मात्र, तिथून अचानक त्यांची पुण्यात बदली करण्यात आली. तिथे रुजू होण्यापूर्वीच त्यांनी स्वतंत्र केबिन, स्वीय सहाय्यकाची मागणी केली. महाराष्ट्र काडरमध्ये या सोयी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना पुरवल्या जात नाहीत. मात्र, पूजा खेडकर यांच्या हट्टाखातर त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र केबिन देण्यात आली. पण ती नाकारून त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बस्तान बसवलं. ते अधिकारी दौऱ्यावर गेले असता पूजा खेडकर यांनी ते केबिनच ताब्यात घेतलं. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सचिवालयाला पाठवल्यानंतर पूजा खेडकर यांची बदली वाशिम येथे करण्यात आली.

पूजा खेडकर वाशिममध्ये रुजू होईपर्यंत त्यांनी आयएएसमध्ये निवड होताना सादर केलेली ओबीसी प्रमाणपत्र, दिव्यांग असल्याची कागदपत्र यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.

आता यासंदर्भात त्यांची विभागीय चौकशी चालू आहे. त्यामध्ये त्या दोषी आढळल्यास त्यांच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई होण्याचीही शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja khedkar ias mother manorama khedkar fir filed for threaten farmers with pistol pmw
Show comments