Pooja Khedkar Missing : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मनमानी कारभार करणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एक-एक कारनामे रोज समोर येत आहेत. नागरी सेवेत येण्याकरता त्यांनी प्रशासनाला विविध पद्धतीने धुळ चारली आहे. दरम्यान, त्यांचं प्रशिक्षण रद्द करून त्यांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनस्ट्रेशन या प्रशिक्षण केंद्रात पुन्हा बोलावण्यात आलं होतं. परंतु, त्या तिथेही हजर राहिलेल्या नाहीत. २३ जुलैपर्यंत येथे पोहोण्याचे त्यांना आदेश देण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. विविध पातळ्यांवर चौकशी सुरू असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाई सुरू केली. यूपीएससीकडून पूजा खेडकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना तुमची आयएएसची निवड का रद्द करू नये? अशी नोटीस पाठवली आहे. पूजा खेडकर यांनी विहित मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्न करून खोटी माहिती दिली असल्याची तक्रार युपीएससीने पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा >> पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांचा खरंच घटस्फोट झालाय का? केंद्र सरकारला संशय, पोलिसांना चौकशीचे आदेश!

चुकीच्या मार्गाने आरक्षित कोट्यातून प्रवेश मिळविल्याचा खेडकरांवर आरोप आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कागदपत्रांची फेरतपासणी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन केली असतानाच मसुरीच्या संस्थेनेही राज्य सरकारकडून अहवाल मागविला होता. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन संस्थेने खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. संस्थेचे पत्र प्राप्त होताच शासनाने प्रशिक्षण स्थगित करून त्यांना कार्यक्रमातून मुक्त केले. तसेच २३ जुलैपर्यंत मसुरीच्या प्रशासन संस्थेत हजर होण्याचा आदेशही शासनाने खेडकर यांना दिला होता. परंतु, त्या काल हजर झाल्या नाहीत.

पुणे पोलिसांच्या चौकशीलाही गैरहजर

दरम्यान, पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळाची तक्रार केली होती. याप्रकरणी चौकशीसाठी पुणे पोलिसांनी पूजा यांना दोनदा नोटीस बजावली. परंतु, या चौकशीलाही त्या हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे पूजा खेडकर बेपत्ता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याशी कोणताच संपर्क नसल्याचंही म्हटलं जातंय.

दरम्यान, आई-वडील विभक्त झाल्याचं सांगत प्रशिक्षाणीर्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर केले होते. परंतु, केंद्र सरकारला आता पूजा खेडकर यांच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीवरच संशय आला आहे. त्यामुळे पालकांची वैवाहिक स्थिती तपासण्यासाठी शहर पोलीस चौकशी करत असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja khedkar missing fails to meet deadline to report at ias training academy sgk