Pooja Khedkar : भारतीय नागरी सेवेतील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे नवनवे कारनामे सातत्याने समोर येत आहेत. बनावट अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधाराने त्यांनी सरकारी नोकरी बळकावल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड वापरून अपंगत्व प्रमाणपत्र मिळवलं होतं, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.
पूजा खेडकर यांनी यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये प्लॉट नंबर ५३, देहू आळंदी, तळवडे हा पत्ता सादर केला असून पिंपरी चिंचवडमधील त्यांचे निवासस्थान असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र या पत्त्यावर निवासी मालमत्ता नसून थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिडेट कंपनी आहे. ही कंपनी आता बंद झाली आहे.
या कंपनीच्या पत्त्याचा वापर करून बनावट रेशनकार्ड तयार करण्यात आल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. याच पत्त्याचा वापर करून पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी लोकोमोटर अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं आहे. २४ ऑगस्ट २०२२ रोजी जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात त्यांना गुडघ्यात सात टक्के अपंगत्व असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.
हेही वाचा >> Pooja Khedkar यांच्यावर LBSNAA ची मोठी कारवाई; जारी केले ‘हे’ आदेश; राज्य सरकारनंही पाठवलं पत्र!
बनावट पत्त्यावर कारचीही नोंदणी
केवळ बनावट अपंगत्व प्रमाणपत्रच नव्हे तर थर्मोवेरिटा कंपनीच्या नावावर ऑडी कारचीही नोंदणी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेच्या कर संकलन विभागानुसार या कंपनीवर गेल्या तीन वर्षांपासून २.७ लाख रुपये थकीत आहेत.
पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणावर स्थगिती
दरम्यान, पूजा खेडकर यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनाी सचिवालयाला पाठवला असू त्यांचं आता वाशिम येथेही प्रशिक्षण होणार नाहीय. कारण आयएएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या LBSNAA अर्थात ‘लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडेमी फॉर अॅडमिनिस्ट्रेशन’ने त्यांच्या जिल्हा प्रशिक्षणावर स्थगिती आणली असून त्यांना तातडीने पुढील कारवाईसाठी अकादमीत हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा >> Pooja Khedkar यांचा सवाल,” …तोपर्यंत मी आरोपी कशी काय?”
वडिलांनी जमवली बेहिशेबी मालमत्ता
तसंच, पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या मालमत्तांचा सविस्तर अहवाल मंगळवारी सायंकाळी राज्याच्या मुख्यालयात सादर केला. दिलीप खेडकर हे २०२० पर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे संचालक होते. त्यांच्यावर याच कार्यकाळात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अधिक चौकशी करून पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.