महाराष्ट्र शासनाचे निवृत्त अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोनदा निलंबित करण्यात आले होते, असं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. दिलीप खेडकर आणि त्यांची पत्नी मनोरमा खेडकर यांच्यावर काही लोकांना बंदूक दाखवून धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलीप खेडकर फरार झाले आहेत. तर, मनोरमा खेडकर यांना आज अटक करण्यात आली. त्यांची मालमत्ता त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्याच्या तक्रारीनंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांची चौकशीही सुरू केली आहे.

दिलीप खेडकर यांना २०१८ आणि २०२० मध्ये निलंबनाला सामोरे जावे लागले होते. NDTV द्वारे ऍक्सेस केलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की २०१५ मध्ये दिलीप खेडकर यांच्या विरोधात किमान ३०० छोट्या व्यावसायिकांनी तक्रार केली होती आणि त्यांच्यावर अनावश्यक त्रास आणि खंडणीचा आरोप केला होता.

हेही वाचा >> Manorama Khedkar Arrested : पूजा खेडकर यांच्या आईला अखेर अटक, शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवणं भोवलं

२०१८ मध्ये, दिलीप खेडकर कोल्हापूर येथे प्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत असताना स्थानिक सॉ मिल आणि लाकूड व्यापारी असोसिएशनने त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली, त्यांनी त्यांचा वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी २५ ते ५० हजार रुपये पर्यंत लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. दिलीप खेडकर हे एकावेळी सहा ते सात महिने परवानगीशिवाय गैरहजर होते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०१९ च्या तक्रारीत दिलीप खेडकर यांनी एका कंपनीकडून २० लाखांची मागणी केल्याचा आरोप केला होता. २०२० च्या आदेशात म्हटले आहे की दिलीप खेडकर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (आचार) नियम, १९७९ च्या नियम ३(१) आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियमांच्या नियम क्रमांक ४ मधील उपकलम १ (अ) अंतर्गत निलंबित करण्यात आले आहे. आदेशात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारींचा हवाला देण्यात आला आणि चौकशी सुरू करण्यात आल्याचेही म्हटले आहे.

हेही वाचा >> पूजा खेडकर यांना पोलिसांचे समन्स; छळ प्रकरणात पुण्यात येऊन जबाब नोंदविण्याचे आदेश

वाशिम पोलिसांचे पथक पुण्यात दाखल

दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी छळ केल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार वाशिम पोलिसांकडून हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता पुणे पोलिसांकडून सुरू असून, खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले आहेत. खेडकर यांनी छळ झाल्याची तक्रार वाशिम पोलिसांकडे दिली आहे. हा प्रकार पुण्यातील असल्यामुळे पुढील चौकशीसाठी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यासाठी वाशिम पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. आता याबाबतची चौकशी पुणे पोलीस करणार आहेत.