पंढरीनाथाचा हा महिमा तुकोबांनी कित्येक शतकांपूर्वी वर्णिला आहे. भक्तीतला तोच भाव आजही कायम राहिला आहे. हात कटेवर ठेवून विटेवर उभे असलेले सावळे परब्रह्म पिढय़ान्पिढय़ा भक्तांना एका चैतन्याच्या ओढीने खेचून नेते आहे. विठ्ठलाच्या व त्याच्या भक्तीचे वर्णन अनेकांनी विविध प्रकाराने केले आहे. पण, भक्त आणि विठ्ठल यातील अगळ्या-वेगळ्या नात्याचे अनेक पदर आजही उलगडले गेले नाहीत. या नात्याचा ठावही आजवर लागलेला नाही. पंढरीची वाट चालायची अन् त्या पंढरीनाथाच्या नगरीत पोहचून धन्यता मानायची. त्यानंतर पुन्हा संसाराचा गाडा हाकायचा. वारीच्या वाटेवर अनेक प्रकारचे लोक आहेत. धन-धान्यांची संपन्नता असणाऱ्यांबरोबरच अगदी फाटके आयुष्य जगणारे लोकही या वारीचा भाग आहेत. दरवर्षी वारी करायचीच, या भावनेने अक्षरश: उसनवारी करून किंवा कर्ज काढून पंढरीची वाट धरली जाते.
संत ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराममहाराज यांच्या पालख्यांसोबत वारी करणाऱ्यांची संख्या आलीकडे वाढते आहे. िदडीत नसणारा, पण सोहळ्याबरोबर चालणाऱ्या मोकळ्या समाजात अनेक प्रवृत्तींचे लोक असतात. या मोकळ्या समाजातील काही लोकांमुळे सोहळ्याची शिस्त बिघडते. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचा विचार सध्या करण्यात येत आहे. वारीत सुविधा वाढल्या, देणाऱ्यांचे हात वाढले, तसा सोहळा वाढला. पण, वाढलेल्या या सोहळ्यात निखळ भक्ती जोपासणारी मंडळीही ठायीठायी भेटतात. त्यांना केवळ माउली, तुकोबांची साथ कळते व विठ्ठलाकडून देण्यात येणारी हाक ऐकू येते. त्यांना कर्मकांड कळत नाहीत, तर केवळ निखळ भक्ती समजते. घरी पिढय़ान्पिढय़ा दारिद्र्याची स्थिती पण, त्यांची वारी कधी चुकली नाही.
मळकटलेले व एक दोन ठिकाणी फाटल्याने ओबडधोबड शिवलेले शर्ट, तशाच अवस्थेतील धोतर किंवा पायजमा घातलेली पुरुष मंडळी. दोन अध्र्या वेगवेगळ्या रंगाची नऊवारी जोडून तयार केलेली साडी घातलेल्या बायका सातत्याने एखाद्या िदडीत किंवा िदडीबाहेर चालताना दिसतात. प्रामुख्याने विदर्भ किंवा मराठवाडय़ाच्या काही भागातून येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये ही मंडळी दिसून येतात. घरी कोरडवाहू शेती. पाऊस पडला, तरच धान्य पिकणार. एकद्या वर्षी पावसाने दगा दिला, तर खाण्यासाठीही दुसऱ्याकडून धान्याची उसनवारी करावी लागते. ही शेतीही वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज काढूनच करायची. वर्षांची वारी आली की, ती चुकवायची नाही. दिंडीत भिशी देण्यासाठी किंवा इतर खर्चासाठी ही मंडळी वारीसाठीही एखाद्याकडून कर्ज घेतात. वारी आपल्या खर्चातूनच करायची, त्यासाठी वाटेवर कुणाकडे हात पसरायचे नाहीत, हा त्यामागचा उद्देश असतो.
हरिभक्तीत तल्लीन होत शेकडो मैलांचा पायी प्रवास करून पंढरीनाथाच्या नगरीत पोहोचायचे. आषाढीच्या सोहळ्याचा भाग व्हायचे अन् घरी परतायचे. संसाराच्या गराडय़ात परतल्यानंतर वर्षभर सर्व प्रकारच्या कर्जाची जुळवाजुळवा करायची. शेतीत काही पिकले नाही, तर मोठय़ा बागायतदाराकडे मजुरी करून पैसे मिळवायचे. पुढची वारी येईपर्यंत कर्ज फेडायचे. पण, पुढची वारी येईपर्यंत कर्जाचे हे चक्र पुन्हा सुरू होते. काहीजण पिढय़ान्पिढय़ा असे फाटके जीवन घेऊन पंढरीनाथाकडे येतात. तेथे काय मागणं मांडतात हे माहीत नाही, पण आयुष्य फाटके असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर लाख मोलाचे समाधान मात्र स्पष्टपणे दिसते..!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा