केवळ जनहित विचारात घेऊन व कायद्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करून प्रशासन चालविताना सदसद्विवेक बुध्दी चोवीस तास जागी ठेवून व संवेदनशीलता बाळगून काम केले. प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे अधिकाऱ्याची लोकप्रियता वाढते. परंतु ही लोकप्रियता राजकारण्यांना सहन होत नाही आणि त्यांची अडचण होते, असे मनोगत सोलापूर महापालिकेचे मावळते आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मांडले.
पारदर्शक, स्वच्छ व विकासाभिमुख प्रशासन चालवून शहराच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करणारे आयुक्त गुडेवार यांची अवघ्या अकरा महिन्यांच्या काळातच शासनाने बदली केली. त्यानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघात गुडेवार यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते गुडेवार यांचा शाल, पुष्पपरडी व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी उत्तरादाखल बोलताना गुडेवार यांनी सोलापूरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यात संधी मिळाल्यास सोलापुरात पुन्हा येण्यास नक्कीच आवडेल, अशी भावना व्यक्त केली.
महापालिकेतून बदली झाल्याचे कळताच योगायोगाने सोलापुरातच मुक्कामाला आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपणास भेटण्याची इच्छा व्यक्त केली व संपर्क साधला. भागवत यांचा टेलिफोन आला तेव्हा घरात शेजारी आपली पत्नी होती. तिने कोण मोहन भागवत, अशी विचारणा केली. तेव्हा आपण नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना व आता पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ज्यांच्या पायावर मस्तक ठेवले, ते हेच मोहन भागवत असल्याची ओळख करून दिली. तेव्हा पत्नीलाही अशा थोर व्यक्तीचा पतीला टेलिफोन आल्याबद्दल आश्चर्य वाटले. गुडेवार यांनी हा तपशील सांगताना भागवत यांच्यासारख्या थोर व्यक्तीने भेटण्याची इच्छा व्यक्त करणे व त्यानुसार आपण त्यांची भेट घेणे, हा वादाचा मुद्दा होऊच शकत नाही. आपण कोणतीही विशिष्ट विचारसरणी बाळगून काम करीत नाही, तर घटनेने सांगितलेली कर्तव्ये आणि दिलेले अधिकार शिरसावंद्य मानतो. केवळ जनहिताला प्राधान्य देतो, अशा शब्दात स्पष्टीकरणही गुडेवार यांनी दिले.
दरम्यान, आयुक्त गुडेवार यांची झालेली बदली रद्द व्हावी म्हणून सोलापुरातील आम आदमी पार्टीचे तरूण कार्यकर्ते मकरंद चनमल यांच्यासह चौघाजणांनी मुंबई उच्च न्यायालयात वेगवेगळ्या चार जनहित याचिका दाखल केल्या आहेत.
प्रामाणिक कामातून अधिकाऱ्याची लोकप्रियता पुढाऱ्यांना सहन होत नाही
केवळ जनहित विचारात घेऊन व कायद्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करून प्रशासन चालविताना सदसद्विवेक बुध्दी चोवीस तास जागी ठेवून व संवेदनशीलता बाळगून काम केले.
First published on: 29-06-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular officer in honest work