अकोले : महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईसाठीचा रोप वे अकोले तालुक्यातूनच व्हावा, अशी आग्रही मागणी करतानाच अकोल्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून कोणत्याही स्थितीत रोप वे होऊ दिला जाणार नाही, असा निर्धार कळसुबाई शिखर असणाऱ्या बारी आणि जहागीरदारवाडीच्या गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.रोप वेच्या प्रस्तावाचे स्वागत करतानाच निसर्गाची हानी होऊ न देता, तसेच स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होऊ न देता रोप वे व्हावा, यासाठी रोप वे करताना स्थानिकांना विश्वासात घेऊनच तो करावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. बारी व जहागीरदारवाडीच्या हद्दीतून रोप वे न करता अन्य ठिकाणावरून रोप वे करण्याचा प्रयत्न झाल्यास रोप वेचे काम होऊ दिले जाणार नाही, ते काम बंद पाडू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे रोप वेच्या प्रश्नावर आता अहिल्यानगर (अकोले) आणि नाशिक (इगतपुरी) असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पर्वतमाला योजनेत राज्यातील ४५ रोप वे प्रकल्पांना राज्य शासनाने तत्त्वतः मान्यता दिली असून, त्यात अकोल्यातील कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्रगड या दोन रोप वे प्रकल्पांचा समावेश आहे. १६४६ मीटर उंचीचे राज्यातील सर्वांत उंच असे कळसुबाई शिखर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर अकोले तालुक्यात बारी, जहागीरदारवाडी या गावात आहे. बारी गावातून गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. शेजारच्या इगतपुरी तालुक्यातूनही गडावर जाता येते. कळसुबाईचा प्रस्तावित रोप वे इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथून व्हावा, अशी त्या परिसरातील लोकांची मागणी आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे त्यासाठी आग्रही आहेत.
या पार्श्वभूमीवर बारी, जहागीरदारवाडीच्या गावकऱ्यांनी आज, शनिवारी बारी येथे पत्रकार परिषद घेऊन रोप वेबाबतची भूमिका स्पष्ट केली. जहागीरदारवाडीचे सरपंच पंढरीनाथ खाडे, उपसरपंच रुक्मिणी खाडे, बारीच्या सरपंच वैशाली खाडे, उपसरपंच गणेश खाडे, ग्रामपंचायत सदस्य भाऊ खाडे, सुनीता खाडे, त्र्यंबक खाडे, ज्येष्ठ नागरिक धुळा खाडे आदी या वेळी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच खाडे यांनी भूमिका स्पष्ट केली.
‘निसर्गदेवता’ कळसुआई आमचे श्रद्धास्थान आहे. पिढ्यान् पिढ्या कळसुबाई शिखराच्या देखभाल आणि प्रशासनाचे काम बारी, जहागीरदारवाडीचे गावकरी करीत आहेत. नवरात्रात लाखो भाविक येथे भेट देतात. शनिवारी, रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. चैत्र महिन्यात दर मंगळवारी भक्तगण नवस फेडायला येतात. या सर्वांची व्यवस्था गावकरीच पाहतात. शिखरावर एखादी दुर्घटना घडली, तर गावातील तरुणांची ‘रेस्क्यू टीम’ मदतीला धावते. शिखरावर जाण्याच्या मार्गावर अनेक छोटे, मोठे स्टॉल असून, त्यांमधून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. या रोजगारावर गदा येऊ न देता गावाला विश्वासात घेऊन रोप वे व्हावा, असे खाडे यांनी सांगितले. बारी, जहागीरदारवाडी ही दोन्ही गावे अनुसूचित क्षेत्रात येतात. त्यामुळे ग्रामसभेच्या परवानगीशिवाय येथे कोणतेही काम करता येत नाही, याची जाणीव त्यांनी करून दिली.
विश्वासात घेतल्यास सहकार्य करू, अन्यथा…
सध्या गडावर जाण्याच्या रस्त्यावर लावलेल्या शिड्या जीर्ण झाल्या आहेत. त्यांची दुरुस्ती व्हावी. आवश्यक तेथे दुहेरी रस्ता करावा, पायऱ्यांची दुरुस्ती करावी अशाही गावकऱ्यांच्या मागण्या आहेत. निसर्गाची हानी होऊ न देता बारी, जहागीरदारवाडी परिसरातून रोप वे व्हावा, तो करताना गावकऱ्यांना विश्वासात घ्यावे, तसे झाल्यास या प्रकल्पासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास गावकरी तयार आहेत. मात्र, इगतपुरी तालुक्यातून रोप वे करण्यास त्यांचा ठाम विरोध असून, तसे प्रयत्न झाल्यास ते हाणून पाडण्याचा गावकऱ्यांचा निर्धार आहे.