महाविकास आघाडीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला. या विजयाला पाच दिवस झाले असतानाच अमरावतीत बळवंत वानखेडे यांचं पोस्टर फाडण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर जो जल्लोष सुरु होता, त्या जल्लोषात बळवंत वानखेडेंचं पोस्ट फाडण्यात आलं. या घटनेनंतर अमरावतीत तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला आहे.
अमरावतीत नेमकं काय घडलं?
लोकसभा निवडणुकीत देशात एनडीएला बहुमत मिळालं आहे. त्यानंतर आज संध्याकाळी ७.१५ वाजता नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या निमित्ताने अमरावतीतल्या राजकमल चौकात भाजपा आणि युवा स्वाभिमानी पक्ष यांच्या वतीने जल्लोष सुरु होता. यावेळी महाविकास आघाडीचे खासदार बळवंत वानखेडे यांचं पोस्टर काही समाजकंटकांनी फाडलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे हे पोस्टर लावण्यात आलं होतं. हे पोस्टर फाडण्यात आल्यानंतर अमरावतीत तणाव निर्माण झाला.
ठाकरे गटाचा नेमका आरोप काय?
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याचा आनंद आम्हालाही आहे. मात्र २०१९ ला भाजपाचे खासदार बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून निवडून आले होते. आज मोदी पंतप्रधान झाल्याचा जल्लोष साजरा करताना बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फाडला. असा आरोप ठाकरे गटाचे नेते सुधीर सूर्यवंशींनी केला. पोलिसांच्या उपस्थितीत या सगळ्यांनी हे कृत्य केलं आहे. आम्ही यांना यांची जागा दाखवणार आहोत. पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असा इशारा ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी दिला.
बच्चू कडूंनी सांगितलं नवनीत राणांच्या पराभवाचं कारण, म्हणाले, “त्यांनी जर..”
दिल्लीत पंतप्रधान मोदींचा शपथविधी सोहळा रंगला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शपथ झाल्यानंतर पाच महत्त्वाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यापाठोपाठ कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून एकूण ७१ जणांना शपथ देण्यात आली. हा सोहळा नुकताच संपला आहे. अमरावतीतल्या राजकमल चौकात शपथविधीचं सेलिब्रेशन सुरु झालं होतं. भाजपा, युवा स्वाभिमानी पक्ष यांच्यातर्फे जल्लोष सुरु होता. त्यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांचं पोस्टर फाडण्यात आलं. त्यावर असलेला बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो फाडला गेला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. आधी बाचाबाची आणि नंतर एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु झाली. यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सद्यस्थितीतही अमरावतीत तणाव कायम आहे.