अमरावतीत माजी राज्यमंत्री व भाजपाचे आमदार प्रवीण पोटे यांच्या पोटे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेटचे रंगकाम करताना चार कर्मचाऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेला चार तास उलटूनही कोणीही मृतदेह पहायला व नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी आलं नाही असा आरोप मृतांच्या नेतेवाईकांनी केलाय. मरण पावलेल्या चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात कॉलेज प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.
कॉलेजमध्ये शिपाई पदावर असतांना कलरिंगचे काम कसे देण्यात आलं?, असा प्रश्न मरण पावलेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने विचारलाय. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व याप्रकरणी दोषीवर कारवाई करण्यात यावी तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नोकरी व आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातून ताब्यात घेणार नाही व शवविच्छेदन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयामध्ये जाऊन घटनेची माहिती घेत नातेवाईकांचे सांत्वन केले. तर मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिल्याने वातावरण तापले आहे. दुपारी या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून तणाव निर्माण झाला आहे. यासंदर्भात कॉलेज प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही.