कराड : मुंबई बाजार समितीतील शौचालय घोटाळयाप्रकरणी बाजार समितीचे संचालक आणि लोकसभेच्या सातारा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या अटकेच्या शक्यतेने शनिवारी सर्वत्र खळबळ उडवून दिली. तर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शशिकांत शिंदेंची पाठराखण करीत अटकेची कारवाई झाल्यास राज्यभर संघर्षाचा इशारा दिल्याने गरमा-गरमी दिसत आहे.
सध्या शरद पवार हे शशिकांत शिंदेच्या प्रचार्थ सभांवर सभा घेत असून, शिंदेंवरील आरोप आणि कारवाईच्या चर्चेमागे दबावाचे राजकारण होत असल्याच्या मुद्द्याचे आयते कोलीत पवारांच्या हाती आले आहे. या साऱ्याच्या अनुषंगाने भाजप व महायुतीवर दबाव, अन्याय आणि निवडणुकीतील पराभव त्याना दिसत असल्याने सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे. तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील तसेच उमेदवार शशिकांत शिंदे यांनी हा सत्तेचा गैरवापर व केवळ दबावाचे राजकारण असल्याचा भाजप आणि त्यांचे उमेदवार खासदार उदयनराजे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पाठोपाठ दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार असल्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आणि संभाव्य कारवाईच्या अंगाने राजकीय वातारण ढवळून निघत आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
मुंबई गुन्हे शाखेने ऐन निवडणुकीत शौचालय घोटाळयाप्रकरणी तपासाची चक्रे गतिमान केल्याने या कारवाईचा लोकांमधून वेगळा अर्थ काढला जात आहे. शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीची १५ दिवसांपूर्वी घोषणा झाली आणि शौचालय घोटाळयाच्या आरोपाने डोकेवर काढले. भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावरून टीका करताना, लगेचच भाजप व माथाडी कामगारांचे नेते, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ‘तुतारीच्या उमेदवाराचा मुतारीत घोटाळा’ या मथळ्याखाली गंभीर आरोप करीत शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव करणार असल्याचा इशारा दिला होता. आणि पुढे झटपट कारवाई आणि आज काही दूरचित्रवाहिन्यांनी शशिकांत शिंदे यांच्या अटकेच्या शक्यतेच्या बातम्या चालवल्याने पुन्हा खळबळ उडाली.
दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी सुरूवातीपासून आपल्यावरील आरोप स्पष्टशब्दात फेटाळताना, कोणत्याही कारवाई, दबावास मी भिणाऱ्यापैकी नाही आणि शरद पवारांची कदापि साथ सोडणार नसून विजय माझाच असल्याने हे षडयंत्र रचल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे.
हेही वाचा…मविआ बैठकीत आ. जयंत पाटील, विश्वजीत कदम यांची झालेली चुकामूक जाणीवपूर्वक की अनावधानाने ?
सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. इथे उदयनराजेंविरोधात शशिकांत शिंदे यांच्यात टोकाचा संघर्ष होत असताना, शौचालय घोटाळ्याचे आरोप आणि अटकेच्या कारवाईची शक्यता व्यक्त झाल्याने राजकीय वातारण तप्त बनले असून, मतदारांमध्ये उलट-सुलट चर्चेसह तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या सगळ्या घटनाक्रम व चर्चा, राजकीय डावपेच तसेच त्याचे निवडणुकीवरील परिणाम राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत राहिले आहेत.