अलिबाग : पावसाळा आला की मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे अवतार कार्य सुरू होते. हे अवतार कार्य गणेशोत्सवापर्यंत कायम असते. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आता याची अनुभूती येऊ लागली आहे. वडखळ ते इंदापूर पट्ट्यात लोणेरेजवळ रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अद्याप संपूर्ण पावसाळा बाकी असल्याने रस्त्याचे काय होणार, याची प्रवाशांना चिंता आहे.

महामार्गावर कासू ते इंदापूर पट्ट्यात रस्ता व पुलांची कामे रखडली आहेत. त्या ठिकाणी पहिल्याच पावसाने रस्त्याची चाळण करण्यास सुरुवात केली आहे. कोलाड आणि लोणेरे येथे उड्डाणपुलांची कामे सुरू असल्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र बाह्यवळण रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्डे, चिखल आणि मातीचे साम्राज्य आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी महामार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. कळंबजे, नवघर, उसरघर, लोणेरे येथील अवस्था अधिकच बिकट आहे. कासू ते कोलाडदरम्यान काँक्रीटीकरण न झालेल्या रस्त्यातही खड्डे आहेत. कोलाड येथील पुई गावाजवळचा पूल जीर्ण झाला आहे. नवीन पुलाचे काम जवळपास ठप्प आहे. त्यामुळे पावसाळ्यात सावित्री पुलासारखी दुर्घटना घडण्याची भीती आहे. महामार्गाच्या दुरवस्थेबाबत अलिबागचे सामाजिक कार्यकर्ते अजय उपाध्ये यांनी तक्रार केल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा >>> ‘तुम्ही विधानसभेची स्वप्नं पाहू नका, कारण महायुतीत…’, अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

कार्यक्षमतेचे तीनतेरा

२०११पासून मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. तेरा वर्षे पूर्ण होत आली तरी अवघ्या ८४ किलोमीटरचे हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. कासू ते इंदापूर मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे ३ एप्रिल २२ रोजी भूमिपूजन झाले. मात्र दोन वर्षांनंतर हे कामही अपूर्ण आहे.

महामार्गावर वाहतूक सूचना फलक बसविण्यात आलेले नाही, रस्त्यावर व्हायब्रेशन्स जाणवत आहेत. खड्डे योग्य प्रकारे भरण्यात आलेले नाहीत. सर्व्हिस रोडची कामे अपूर्ण आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. – ॲड. अजय उपाध्ये, सामाजिक कार्यकर्ते