महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने ३ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून पुकारलेला संप मागे घेण्यात आला असला, तरी दिवसभरात विविध ठिकाणी बिघाडामुळे वीज बंद झाल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला. पिंपरी-चिंचवडच्या उद्योगनगरीत अनेक उद्योगांमध्ये वीज नसल्याने काम ठप्प झाले होते. संपात पुणे परिमंडलातील ९२ टक्के कर्मचारी, अभियंता व अधिकारी सहभागी झाले होते. तर दुसरीकडे मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे विविध कारणांनी खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी ‘ऑन फिल्ड’ होते. त्यामुळे प्रामुख्याने पाणी पुरवठा योजना, मोठी रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा मात्र सुरळीत राहिला.
हेही वाचा >>> पुणे : ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’साठी राज्य शासनाची मान्यता; मंजूर पदांच्या १० टक्के जागा राखीव
संप कालावधीत पुणे शहरामध्ये प्रामुख्याने सिंहगड रोड, वडगाव, हिंगणे, धायरी या परिसरात पहाटे तीनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. एकामागे एक तांत्रिक बिघाड होत गेल्याने अभिरूची, लिमयेनगर, प्रयागा या तीन उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी त्यामुळे सुमारे ३० हजार वीजग्राहकांची मोठी गैरसोय झाली. गंभीर बिघाड लक्षात घेता कार्यकारी अभियंता मनीष सूर्यवंशी व केशव काळूमाळी यांनी कंत्राटदार एजन्सीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बिघाड शोधणे, दुरुस्ती कामाला सुरुवात केली. महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांनी भेट देऊन दुरुस्ती कामांची पाहणी व तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यानंतर बुधवारी दुपारी सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
हेही वाचा >>> राज्यातील माणूस भीक मागत नाही तर हिमतीने, कष्टाने संकटावर मात करतो; शरद पवार यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका
पुणे शहरातील शिवणेमधील उत्तमनगर, वाकड व सांगवीमधील काही परिसर, सुस रोड, म्हाळुंगे, पाषाण, धनकवडी, आंबेगाव, कात्रज, गोकूळनगर, भिलारेवाडी, रामटेकडी, हडपसर गाडीतळ, बीटी कवडे रोड, टिंगरेनगर, मोहननगर, प्रेस कॉलनी, कोथरूडमधील शास्त्रीनगर आदी परिसरात विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. यातील बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत झाला असून उर्वरित ३० टक्के भागांमध्ये दुरुस्ती कामांद्वारे रात्रीपर्यंत वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तळेगाव शहर, इंदोरी, वडगाव, सोमाटणे, नाणेकरवाडी, कुरळी, कडूस गावांना वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला होता. मात्र युद्धपातळीवर दुरुस्ती कामे करून सर्व वीजपुरवठा दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे. तसेच कुदळवाडी, देहूगाव, बोऱ्हाडेवाडी, चिखली तसेच निगडीमधील ओटा स्कीम, जुन्नर, ओतूर गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.
विजेअभावी उद्योग बंद, कोट्यवधीचा फटका
पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक पट्ट्यातील शेकडो लघुउद्योगांना महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसला. सकाळी साडेसात ते साडेअकरा असा जवळपास चार तास वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे लघु उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी माहिती लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली. वीजपुरवठा खंडित असल्याच्या काळात कामगार बसून होते. साडेअकरानंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. मात्र, तोपर्यंत लघुउद्योजकांचे मोठे नुकसान झाले होते. यापूर्वी अशाच प्रकारे दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला, तेव्हा तब्बल १०० कोटींचा फटका बसला होता, याकडे बेलसरे यांनी लक्ष वेधले. पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक विभागातही काही काळ वीज बंद झाली होती.