चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या विस्तारित प्रकल्पाच्या संच क्रमांक ८ आज पहाटे ५.४१ वाजता कार्यान्वित झाला असून ४५ मेगाव्ॉट वीजनिर्मिती ४६ मिनिटात करण्यात आली. याबरोबर चंद्रपूर प्रकल्पाने एक महत्वाचा टप्पा पार केला असून या संचातून मार्चपासून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे.
महानिर्मितीचे प्रकल्प संचालक चंद्रकांत थोटवे यांच्या हस्ते थेट नियंत्रण कक्षातून कळ दाबून कार्यान्वयन करण्यात आले. चंद्रपूर प्रकल्पातील संच क्रमांक ९ चे कामही युध्दपातळीवर प्रगतीपथावर असून त्याचे बॉयलर प्रदीपन मार्च २०१५ मध्ये अपेक्षित आहे. चंद्रपूर प्रकल्पातील संच क्रमांक ८ व ९ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर महानिर्मितीच्या वीजनिर्मितीत १००० मेगाव्ॉटची भर पडेल. याचबरोबर चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची एकूण निर्मिती क्षमता ३३४० मेगाव्ॉट होईल. याप्रसंगी प्रकल्पाचे कार्यकारी संचालक विकास जयदेव, प्रकल्पाचे मुख्य अभियंता वसंत खोकले, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे, निर्मिती बांधकामचे मुख्य अभियंता प्रदीप शिंगाडे, मुख्य अभियंता प्रमोद नाफाडे, उपमुख्य अभियंता संजय काशीकर, अनिल आाष्टीकर, हरिदास चौधरी, अभिजित कुळकर्णी, परमानंद रंगारी, नरेंद्र गुप्ता, राजेंद्र ऐरन व चंद्रपूर प्रकल्पातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. चंद्रकांत थोटवे व वसंत खोकले यांनी महानिर्मितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांचे अथक परिश्रमाबद्दल आभार मानले.
महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालकांनीही या सर्वाचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे, या ८ व्या क्रमांकाच्या संचातून वीजनिर्मितीसाठी प्रदूषण नियंत्रण विभागाने बंद केलेल्या २१० मेगाव्ॉट क्षमतेच्या संच क्रमांक एकचा कोळसा उपयोगात आणला जाणार आहे. या दोन्ही संचासाठी विदेशी कोळसा आयात केला जाणार आहे. त्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.