भाजपच्या नरेंद्र मोदी यांना देशाच्या अन्य भागांतील लोकांबद्दल आस्था नाही, लोकशाही मान्य नाही, देशहिताचा दृष्टिकोन नाही, माणुसकीही नाही. अशा मोदींच्या हाती देशाची सूत्रे देणे चुकीचे आहे, तरीही ते पंतप्रधान होण्यासाठी ‘घोडय़ा’वर बसले आहेत. हे घोडे केव्हा उधळेल सांगता येणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
पवार यांच्या उपस्थितीत पाथर्डीतील बाजारतळावर मंगळवारी दुपारी झालेल्या सभेत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्या वेळी पवार बोलत होते. पालकमंत्री मधुकर पिचड, आ. बबनराव पाचपुते, आ. चंद्रशेखर घुले, आ. शंकरराव गडाख आदी या वेळी उपस्थित होते. सभेला चांगली गर्दी जमवण्यात आली होती. सभेपूर्वी पवार यांनी व्यासपीठामागील एकलव्य शिक्षण संस्थेत जाऊन माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांची भेट घेतली. मात्र ढाकणे व्यासपीठावर आले नाहीत.
आपल्याशी समविचारी असलेल्या ढाकणे यांचे चिरंजीव अन्य पक्षात असावेत याबद्दल आपल्या मनात अस्वस्थता होती, परंतु त्यांनी धाडसी व वैचारिकपणे निर्णय घेतला असा उल्लेख पवार यांनी केला. प्रागतिक विचारांचा जिल्हा असलेल्या नगरमध्ये भाजपचे नाव यावे, हे चुकीचे आहे. ही दुरुस्ती करण्याची जबाबदारी मतदारसंघाने स्वीकारावी, असे आवाहन पवार यांनी केले.
लोकशाहीत निवडून आलेले खासदार बहुमताने पंतप्रधान निवडतात हे मोदींना मान्य नाही. कोणीतरी एक पंतप्रधान होण्यास निघाला आहे आणि ते आधीच घोडय़ावर बसले आहेत, हे घोडे कधीही उधळेल. मतदार भल्याभल्यांना धडा शिकवतात. मतदारच या देशाला योग्य दिशा देतील. मोदींना या देशाचा इतिहास माहीत नाही, ते देशाचा इतिहास काय निर्माण करणार? देशहिताचा दृष्टिकोन नाही, अशा माणसाच्या हाती देशाची सूत्रे कशी देणार? महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यानंतर गुजरातमधील कंपन्यांनी मोफत पशुखाद्य देऊन मदत केल्याबद्दल मोदी यांनी त्यांच्यावर खटले दाखल केले. पूर्ण देशाला जे बरोबर घेऊ शकत नाही, अन्य भागांतील लोकांबद्दल त्यांना आस्था नाही, अहमदाबादमधील दंगलीत एक मुस्लिम खासदार व २० जणांना जिवंत जाळण्यात आले, मात्र मोदी त्यांच्या नातेवाइकांना माणुसकीच्या नात्याने भेटायला गेले नाहीत, सत्ता ही लोकांसाठी असते हे ज्यांना माहीती नाही, त्यांच्या हाती देश कसा देणार, अशी टीका पवार यांनी केली.
ओबीसींचे नेते म्हणवणाऱ्यांनी ओबीसींची चळवळ संपवली. समाजातील एकालाही मोठा होऊ दिले नाही. ओबीसींच्या उन्नतीसाठी केवळ भाषणे नकोत, कृती हवी, अशी टीका प्रताप ढाकणे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे नाव न घेता केली. पवार हे वंचितांना आधार देणारे आहेत, बहुजनांचा विचार करणारे आहेत, त्यामुळेच आपण हा निर्णय घेतल्याचे ढाकणे म्हणाले. उमेदवार राजळे, आ. घुले, अंकुश काकडे आदींची भाषणे झाली.
ढाकणे यांचा इशारा
प्रताप ढाकणे यांना राष्ट्रवादीत सन्मानाची वागणूक दिली जाईल. इतरांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी दिली जाईल तसेच त्यांना ‘योग्य वेळी संधी दिली जाईल’, असे शरद पवार यांनी सांगितले. राजळे व घुले यांनी आपल्याला मान नाही दिला तरी चालेल, परंतु अपमानित करू नये, असा स्पष्ट इशारा प्रताप ढाकणे यांनी दिला. गोपीनाथ मुंडे यांचे नाव न घेता ढाकणे म्हणाले, ‘सावड’साठी किमान चार बैलांची आवश्यकता असते, परंतु ते एकाच बैलाची सावड करत आहेत. इतरांसाठी ते सवड काढायला तयार नाहीत. पवारांच्या नेतृत्वाखाली आपण सावड करण्यासाठी सवड काढू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा