शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले की काही लोकांच्या पोटात गोळा उठतो. कांद्याचे दर वाढले तरी मी निर्यात बंदी करणार नाही असे संसदेतही ठणकावून सांगितले. महागाईबद्दल माझ्यावर टीका होते. पण मी केंद्रात मंत्री असेपर्यंत शेतकरी हिताला बाधा होईल असे धोरण चालू देणार नाही. शेतकरी समाज संघटित असेल तर देशात कुठलेही सरकार आले तरी फरक पडणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. मराठवाडा व नगरचा पाणीप्रश्न वाद न करता एकत्र बसून सोडविण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन कृषिमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड होते. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, शंकरराव कोल्हे, आमदार चंद्रशेखर घुले, अरुण जगताप, माजी खासदार यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे, माजी आमदार भानुदास मुरकुटे आदी उपस्थित होते.
कृषिमंत्री पवार म्हणाले, कांद्याचे भाव वाढले तेव्हा एक खासदार कांद्याची माळ गळ्यात घालून आले. वाहिन्यांनी माझ्यावर टीका केली. शेतमालाचे भाव वाढले की मला जबाबदार धरले जाते. आता साखरेचे दर कमी होत आहेत. त्याचा ऊसधंद्यावर विपरित परिणाम होऊन उसाला कमी दर मिळेल. त्यामुळे आयात साखरेला २५ टक्के शुल्क लावू, येत्या चार महिन्यात २० लाख टन साखर निर्यात करू, त्याने साखरेची दरवाढ होईल, उत्पादन खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांनी कर्जाचे ओझे कायम वाहायचे का, त्यामुळे पिकवणाऱ्यांच्या हिताचे धोरण मी कृषिमंत्री असेपर्यंत घेईल. त्याला विरोध करणाऱ्यांचे चालू देणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.
पाण्याच्या कमतरतेमुळे मराठवाडा व नगर, नाशिक या विभागात वाद सुरू झाला आहे. कोकणातील पाणी वळविण्याकरिता निधी उपलब्ध करून देऊ, पाण्याचे धोरण राज्याला घ्यावे लागेल. शेतकरी हा भाऊ आहे. तीच त्याची जात आहे. शेती हा त्याचा धर्म आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद न होता सामोपचाराने प्रश्न सोडवू, असे पवार म्हणाले. शेतकऱ्यांना सरकार १ रुपया २० पैसे दराने वीज पुरवठा करते. पण सहवीज निर्मिती प्रकल्पाची वीज ५ रुपये ७० पैशाने खरेदी करते. जगात वीजदरात वाढ होत आहे. राज्यात उद्योगाला ८ रुपये युनिट दराने वीज पुरविली जात असल्याने कारखानदारी कमी होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. साखर कारखान्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचे देणे चुकते करावे, असा आदेश पवार यांनी यावेळी अशोकसह राज्यातील साखर कारखान्यांना दिला. पिचड यांनी मागील वर्षी मराठवाडय़ाकरिता पवार यांच्या सुचनेनुसार पाणी सोडले. त्याला विरोध होता. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे पुतळे मराठवाडय़ात जाळण्यात आले. हा अतिरेक आहे. कोल्हे यांची मागणी चुकीची नाही. पण याप्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढावा लागेल. कोकणात वाहून जाणारे पाणी या भागात वळविले तर मराठवाडय़ासह दोन्ही विभागाचा प्रश्न सुटू शकेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार मुरकुटे यांचे भाषण झाले. आभार भास्कर खंडागळे यांनी मानले. कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा