छापा घातल्याने पोलिसांची तारांबळ
नागपूर : शहरातील अवैध धद्यांविषयी सामान्य नागरिक पोलिसांकडे तक्रार करीत असले तरी हेअवैध धंदे राजरोस सुरू असतात. तक्रारीनंतर असे धंदे कसे सुरू राहतात, याचे कोडे नागरिकांना काही उलगडत नाही. अनेकवेळा पोलीस व बेकायदा धंदे चालवणाऱ्यांतील अर्थपूर्ण संबंधाची चर्चा सुरू राहते. मात्र, अशा धंदेवाल्यांविरुद्ध पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेच रस्त्यावर उतरले व त्यांनी छापा टाकला तेव्हा पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
महादुल्यातील जयभीमनगर भागात संतोष शाहू याने चार हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण केले आहे. तेथे बांधकाम करून तो हॅपी क्रीडा व मनोजरंजन केंद्राच्या नावाखाली जुगार अड्डा चालवत होता. याबाबत नागरिकांनी कोराडी पोलिसांत तक्रार केली. मात्र, पोलिसांनी दखल घेतली नाही. अखेर नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. बावनकुळे यांनी बुधवारी सकाळी थेट अवैध जुगार अड्डय़ावर छापा टाकला. या ठिकाणी बावनकुळे यांना जुगाराचे साहित्य, टोकण, रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्याने बावनकुळे यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पालकमंत्र्यांनी छापा टाकल्याचे कळताच कोराडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश ठाकरे ताफ्यासह तेथे पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शाहू याला अटक केली. शाहू याने सहा महिन्यापूर्वी हा अड्डा जरीपटका येथील गुन्हेगाराला चालवण्यासाठी दिल्याचेही समोर आले. महादुला परिसरात पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अनेक अवैध धंदे सुरू असल्याचे लोक बोलतात.