वाळूमाफियांची दादागिरी मोडून काढण्यासाठी एकीकडे महसूलमंत्री एकनाथ खडसे कठोर कायदे करण्याची भाषा करीत असताना दुसरीकडे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे वाळूमाफियांचे ट्रक कारवाई न करता सोडून देण्यासाठी दूरध्वनी करून अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
कामठी तालुक्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चार पथके तयार केली. या पथकांनी गेल्या फेब्रुवारीत सहा ट्रक पकडले होते. यातून चोरीची वाळू नेण्यात येत होती. ‘या सर्व वाहनांना तत्काळ सोडून द्या,’ असे सांगणारा दूरध्वनी त्याच दिवशी रात्री १२ वाजता राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला होता. दूरध्वनी येताच अधिकाऱ्यांनी ही वाहने कारवाई न करता सोडून दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नियमितपणे वाळूमाफियांवर केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात येतो. २६ फेब्रुवारी २०१५ रोजी या संदर्भात महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यात संबंधित अधिकाऱ्याने ‘पालकमंत्र्यांनी दूरध्वनी केल्याने वाहने सोडून दिली’ असे स्पष्टपणे सांगितले. यामुळे उपस्थित अधिकारी अवाक् झाले. यावर तत्कालीन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी असे दूरध्वनी येण्याआधीच कारवाई करून मोकळे व्हा, असा सल्ला अधिकाऱ्यांना दिला. बैठकीत झालेला हा सर्व घटनाक्रम इतिवृत्तात नमूद करण्यात आला असून, त्याची प्रत ‘लोकसत्ता’जवळ उपलब्ध आहे. इतिवृत्तात पालकमंत्री असा शब्दप्रयोग असला तरी बावनकुळे यांच्याकडेच नागपूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा आहे. कामठी हा त्यांचा मतदारसंघ आहे.
नागपूर हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आहे. त्यांच्याकडे गृह खातेसुद्धा आहे. त्यांच्याच जिल्ह्य़ात त्यांच्याच मंत्रिमंडळातील सदस्य वाळूचे ट्रक सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना दूरध्वनी करीत असल्याचा हा प्रकार अतिशय गंभीर आहे.

वाळूचे ट्रक सोडवण्यासाठी मी कोणालाही दूरध्वनी केला नाही आणि करणारही नाही. अनेक वर्षांपासून मी सार्वजनिक क्षेत्रात काम करीत असून चुकीच्या कामासाठी कधीही कोणाला दूरध्वनी केलेला नाही.
चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, नागपूर</strong>

Story img Loader