जिल्हा बँकेचा बिघडलेला कारभार रुळावर आणणारे अशी ओळख असणारे काँग्रेसचे नेते सुरेश पाटील यांच्या सहकार बँक विकास पॅनेलचे १८ संचालक निवडून आले, मात्र कन्नड मतदारसंघातून हिवरखेडा येथील अशोक सर्जेराव मगर यांच्या विजयामुळे सुरेश पाटील यांना चांगलाच हादरा बसला. या तालुक्यात सुरेश पाटील यांचे वर्चस्व आहे. केवळ एक मताने विरोधी पॅनेलच्या दोन जागा निवडून आल्या. औरंगाबाद जिल्हा बँक १२० कोटींनी तोटय़ात होती. मात्र, अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ती आता २० कोटींनी नफ्यात आणली आहे.
औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे, जावेदखाँ शब्बीरखाँ, नंदकुमार मुरलीधर गांधेले, अशोक रंधे, बाबुराव पवार हे ५ संचालक बिनविरोध निवडून आले. त्यामुळे २० जागांसाठी झालेल्या मतदानात सहकार पॅनेलचा विजय झाला. वैयक्तिक सभासद मतदारसंघातील एक पद रिक्त आहे. अब्दुल सत्तार, रामकृष्ण पाटील, किरण पाटील, प्रभाकर पालोदकर, रंगनाथ बाबुराव काळे, अभिजित देशमुख, दामोधर नवपुते, सुरेश दयाराम पाटील, हरिभाऊ किसनराव बागडे, नितीन सुरेश पाटील, वर्षां जगन्नाथ काळे, मंदाबाई माने, दशरथ शंकरराव गाडकवाड हे संचालक निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नारायण आघाव यांनी जाहीर केले.
सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणाऱ्या जिल्हा बँकेच्या कारभारात भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी तशी कधी ढवळाढवळ केली नव्हती. मात्र, या निवडणुकीनंतर अध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. निवडून आलेल्या अनेकांना सुरेश पाटील यांनी पायउतार व्हावे, असे वाटत असल्याने अध्यक्षपद नक्की कोणाकडे याकडे लक्ष लागले आहे.

Story img Loader