जायकवाडी धरणातून पाणी देण्यास जलसंपदा विभागाची असमर्थता, तसेच पावसाअभावी निर्माण झालेली पाणीटंचाई यामुळे अखेर परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील दोन संच बंद करण्यात आले. त्यामुळे ४६० मेगावॅटने वीजनिर्मिती घटली आहे. जेमतेम महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असला, तरी पाणीटंचाईच्या झळा आता वीजनिर्मिती केंद्राला बसू लागल्या आहेत. आगामी काळात कोठूनच पाणी उपलब्ध न झाल्यास इतर संचही बंद पडून वीजनिर्मितीच थांबणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
परळी औष्णिक केंद्रात २५० मेगाव्ॉट क्षमतेचे दोन व २१० मेगावॅट क्षमतेचे तीन अशा पाच संचांमधून साडेअकराशे मेगावॅट निर्मिती केली जाते. त्यासाठी दररोज सुमारे ११ लाख ६० हजार लिटर पाणी लागते. यासाठी खडका येथील गोदावरी पात्रातील बंधाऱ्यातून पाण्याचा वापर केला जातो. पाऊस पडल्यानंतर गोदावरी व आजूबाजूच्या नद्यांमधून पाणी येत असल्याने वीज केंद्रासाठी पाण्याची टंचाई पूर्वी कधी निर्माण झाली नाही. या वर्षी मात्र पाऊसच न पडल्यामुळे नदीत पाणीच आले नाही. दुसऱ्या बाजूला माजलगाव प्रकल्पातून जुलै, ऑगस्टमध्ये पाणी घेण्यात आले होते. मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे बंधारा पूर्णपणे भरला असला तरी महिनाभर पुरेल इतकेच पाणी उपलब्ध आहे. पैठणच्या जलाशयातून गोदावरी पात्रामार्फत पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, गोदावरीत नाशिक, नगर जिल्ह्य़ांतून पाणी मिळत नसल्याने जलसंपदा विभागाने औष्णिक वीज केंद्रास पाणी देण्यास असमर्थता दर्शवली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रेल्वेच्या व्ॉगनमधून पाणी देण्याचा विचारही बोलून दाखवला होता. त्यामुळे वीज केंद्रासाठी पाण्याची उपलब्धता होईल, असे वाटत असतानाच जलसंपदा विभागाने पाणी देण्यास नकार दिला. परिणामी, आता वीज केंद्रातील संच पाण्याअभावी बंद करण्याची वेळ ओढवली आहे. दोन दिवसांपासून वीज केंद्रातील २५० मेगाव्ॉट क्षमतेचा एक व २१० मेगावॅट क्षमतेचा एक असे दोन संच बंद करण्यात आले. त्यामुळे ४६० मेगावॅट विजेची घट झाली आहे. आगामी काळात पाण्याची उपलब्धता होऊ न शकल्यास इतर संचही टप्प्याटप्प्याने बंद करण्याची वेळ वीजनिर्मिती प्रशासनावर ओढवणार आहे. परिणामी, ११३० मेगाव्ॉट विजेची तूट निर्माण होऊन अनेक भागांत अंधाराचे साम्राज्य पसरण्याची शक्यता आहे.
४६० मेगावॅट वीजनिर्मिती घटली
जायकवाडी धरणातून पाणी देण्यास जलसंपदा विभागाची असमर्थता, तसेच पावसाअभावी निर्माण झालेली पाणीटंचाई यामुळे अखेर परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील दोन संच बंद करण्यात आले.
First published on: 17-11-2012 at 04:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power production reduces