भूमिगत वीजवाहिनी जळाल्याने सोमवारी बोईसरच्या काही भागात आठ तास वीजपुरवठा खंडित झाला. उन्हाळ्यात ऐन सणासुदीच्या दिवशी वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. महावितरण विभागाकडून नादुरुस्त वीजवाहिनीची दुरुस्ती केल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

बोईसरच्या ओसवाल परिसरात ११ केव्हीची भूमिगत वीजवाहिनी जळाल्याने सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सरावली ग्रामपंचायत हद्दीतील ओसवाल एम्पायर, धोडीपूजा, संजय नगर आणि महावीर चेंबर या रहिवासी भागातील वीज पुरवठा खंडित झाला. सोमवारी सर्वत्र ईद सणाचा उत्साह सुरू असताना त्यातच उन्हाच्या प्रकोपामुळे नागरिक हैराण झाले असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली.

दिवसभर वीज पुरवठा खंडित झाल्याने दुकाने व खाजगी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिघाड शोधून वीज वाहिनीची दुरुस्ती केल्यानंतर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तब्बल आठ तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यश आले. मात्र दिवसभर वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले.