राज्यातील शिक्षण संस्थांनी मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या ६३व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस कवायत मैदानावर भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्ह्याचा मुख्य ध्वजवंदन कार्यक्रम झाला.
याप्रसंगी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, खा. समीर भुजबळ, आ. निर्मलाताई गावित, आ. बबन घोलप, आ. जयंत जाधव, विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर, जिल्हाधिकारी विलास पाटील आदी उपस्थित होते. या वेळी भुजबळ यांनी मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्याची माहिती दिली. सहा ते चौदा वयोगटातील मुला-मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी २०१०मध्ये राज्यात हा कायदा लागू झाला. समाजातील सर्व घटक, शिक्षक व व्यवस्थापनाने या कायद्याची तळागाळापर्यंत अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहावे. शाळा व्यवस्थापन समितीने यावर देखरेख ठेवावी. या कायद्याचा प्रभावीपणे वापर करून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे व पालकांनीही मुलांना नियमित शाळेत पाठवावे, असेही त्यांनी नमूद केले. राज्यात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा काटेकोरपणे वापर करून नियोजन करावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रपती पदकाचे मानकरी नागरी संरक्षण विभागाचे उपनियंत्रक किसन सांगळे, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काशिगीर गोसावी यांना पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
आदर्श तलाठी पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण, जिल्हा क्रीडा युवा पुरस्कारासाठी निवड झालेले खेळाडू, कार्यकर्ता, मार्गदर्शक व एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियानांतर्गत ग्राम पंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संचलनात पालकमंत्र्यांनी निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), गृहरक्षक दल, राज्य उत्पादन शुल्क, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय हरितसेना, स्काऊट गाईड, आरएसपी, सामाजिक वनीकरण अशा एकूण ३७ विभागांची पथके संचलनात सहभागी झाली होती.