आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा माजी खासदार सुरेश प्रभू आणि विद्यमान खासदार नीलेश राणे यांच्यात सामना रंगणार, अशी चिन्हे आहेत.
या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे खासदार नीलेश राणे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे, पण शिवसेनेकडून त्यांच्याशी कोण लढत देणार, याबाबत विविध तर्क लढवले जात आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेचे मावळते खासदार प्रभू यांनी कडवी लढत दिल्यामुळे राणे यांना अपेक्षेपेक्षा फारच कमी मतांनी (४६ हजार) विजय शक्य झाला. पण त्यानंतर प्रभू कोकणच्या सार्वजनिक जीवनातून जणू अदृश्यच झाले. त्यामुळे या पराभवामुळे त्यांनी राजकीय संन्यास घेतला, असे मानले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून मात्र ते पुन्हा सक्रिय झाले असून गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी सिंधुदुर्गमध्ये प्रमुख राजकीय कार्यकर्त्यांच्या खासगी भेटीगाठी केल्या. येत्या सोमवारी (७ ऑक्टोबर) प्रभू चिपळूण-रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. चिपळूणचे शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत. तेथून ते संध्याकाळी  रत्नागिरीत येणार आहेत. येथील शिवसेनेच्या कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.या दौऱ्याच्या माध्यमातून प्रभू मागील निवडणुकीनंतर पक्षपातळीवर प्रथमच क्रियाशील झाल्याचे दिसून येत आहे. तसेच निकटवर्तीयांबरोबर अनौपचारिकपणे चाचपणीही सुरू केली आहे.
शिवसेनेचे आमदार विनायक राऊत हेही गेल्या वर्षांपासून कोकणात नियमितपणे येऊन पक्षसंघटन बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. सेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचेही नाव घेतले जात आहे. पण त्यांच्यापेक्षा प्रभू सर्वार्थाने वजनदार उमेदवार मानले जातात. उच्चशिक्षित, सुसंस्कृत राजकारणी अशी प्रतिमा असलेल्या प्रभू यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याशी असलेली जवळीक ही आणखी एक महत्त्वाची जमेची बाजू मानली जाते.

Story img Loader