|| सुहास बिऱ्हाडे

नालासोपारा मतदारसंघातून ‘बविआ’तील ठाकूर कुटुंबातील तिघांचे उमेदवारी अर्ज:- चर्चेच्या लढतींपैकी नालासोपारा मतदारसंघातील लढत माजी अधिकारी प्रदीप शर्मा आणि अजूनपर्यंत जाहीर न केलेल्या ‘बविआ’च्या उमेदवाराविरोधात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात ‘बविआ’च्या हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि प्रवीणा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

वसई मतदारसंघाचे विभाजन होऊन नालासोपारा या स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती झाली. नालासोपारा आणि विरार शहरांचा मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे. ऑगस्ट २०१९ पर्यंत केलेल्या मतदार नोंदणीनुसार या मतदारसंघाची मतदार संख्या पालघर जिल्हय़ातील सर्वाधिक म्हणजे ५ लाख १२ हजार ३५७ एवढी आहे. या मतदारसंघात आतापर्यंत २००९ आणि २०१४ अशा दोन विधानसभांच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकीत वसईतील पालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे येथील आमदार आहेत. त्यामुळे नालासोपारा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जात होता. विरारमधील स्थानिक वाडवळ, भंडारी, सोमवंशी क्षत्रिय, आगरी, किनारपट्टीवरील कोळी आदी स्थानिक मराठी भूमीपुत्र मुंबईतून येऊन स्थिरावलेला मराठी कोकणी मध्यमवर्गीय या मतदारसंघात आहे. मात्र हा मतदारसंघ ओळखळा जातो तो उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या परप्रांतीयांसाठी. नालासोपारा पूर्वेला हजारोंच्या संख्येने परप्रांतीयांच्या वसाहती आहे.

बविआचा सुरक्षित मतदारसंघ असला उत्तर भारतीयांच्या वाढत्या संख्येमुळे या मतदारसंघात भाजपने आपली पकड बनविण्यास सुरुवात केली होती. मागील वर्षी झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सेना-भाजप स्वतंत्र लढले होते. भाजपचे राजेंद्र गावित त्यात जिंकले आणि नालासोपारामधून त्यांनी चांगली आघाडी घेतली होती. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे गावित यांना नालासोपारामधून २५ हजार मतांची आघाडी मिळाली आणि बविआचा हा सुरिक्षत किल्ला भेदू शकतो असा विश्वास सेना-भाजप या दोन्ही पक्षांमध्ये आला. नालासोपारा पूर्वेला उत्तर भारतीयांची ८० हजार निर्णायक मते आहेत. त्यामुळेच लोकसभेच्या प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, मनोज तिवारी आदी येथे प्रचारासाठी आले होते. उत्तर भारतीय, गुजराती हा भाजपसाठी एकगठ्ठा मतदान करणारा मतदारसंघ मानला जातो. या उत्तर भारतीय मतदारांमुळे भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला होता. मात्र आता ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला आली आहे

२००९च्या विधानसभा निवडणुकीत बविआच्या क्षितिज ठाकूर यांनी शिवसेनेच्या शिरीष चव्हाण यांचा पराभव केला होता. क्षितिज यांना ८९ हजार २८४ मते तर चव्हाण यांना ४८ हजार ५०२ मते मिळाली होती. क्षितिज ठाकूर यांनी ४० हजार ७८२ मतांनी विजय मिळवला होता. २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. जर सेना-भाजप यांची एकत्रित मते १ लाख १३ हजार ५६६ एवढी होती. भाजपच्या राजन नाईक यांना ५९ हजार ६७ तर शिवसेनेच्या शिरीष चव्हाण यांना ४० हजार ३२१ मते मिळाली होती. राजन नाईक यांनी ठाकूर यांना झुंज दिली, मात्र त्यांचा ५४ हजार ४९९ मतांनी पराभव झाला. त्यामुळे २०१९च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाईक यांनी मतदारसंघाचीच बांधणी हाती घेतली होती. घराघरात जाऊन त्यांनी प्रचार चालू केला होता. मात्र यंदा उद्धव ठाकरे यांनी नालासोपारा मतदारसंघ मागून घेतला आणि या ठिकाणी शिवसेनेतून माजी चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली. शर्मा यांच्याभोवती असलेले वलय यामुळे ही निवडणूक चुरशीची मानली जात आहे. शर्मा यांनी कॉर्पोरेट कंपन्या नेमून प्रचार सुरू केला. शहरात येण्यापूर्वीच त्यांनी चोर-पोलीस असे वादग्रस्त फलक लावून खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांचा धडाक्यात प्रचार सुरू असला तरी बविआ पुन्हा क्षितिज ठाकूर यांन रिंगणात उतरविणार की शर्मा यांना चारही मुंडय़ा चीत करण्यासाठी खुद्द हितेंद्र ठाकूर मैदानात उतरणार ते ७ तारखेला स्पष्ट होणार आहे.

नालासोपारा शहराच्या पूर्वेला हजारोंच्या संख्येने चाळी, अनधिकृत इमारती आहेत. अरुंद रस्ते, त्यावर झालेली अतिक्रमणे, नियोजनशून्य उभ्या राहिलेल्या इमारती आणि दररोज शेकडोंच्या संख्येने होत असलेली लोकसंख्येची वाढ ही नालासोपारा मतदारसंघाची ओळख आहे.

बकाल शहर म्हणून नालासोपारा शहराला ओळखले जाते. पाऊस पडला की नालासोपारा जलमय होते. ही सर्वात मोठी समस्या आहे. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, अतिक्रमणे, रिक्षाचालकांची दादागिरी, फेरीवाल्यांचा विळखा आदी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. क्षितिज ठाकूर हे परदेशातून उच्चशिक्षण घेऊन आलेले तरुण आमदार आहेत.

त्यांनी वसई-विरार शहराचा चेहरा बदलण्यासाठी योजना आणल्या आहेत. त्यांच्या संकल्पनेतून कृत्रिम जंगल विकसित होत असून त्यात भविष्यात पर्यटनाला चालना मिळण्याची आशा मतदारांना आहे.

भाजपची नाराजी

भाजपच्या राजन नाईक यांना डावलल्याने त्यांच्या नाराजीचा फटका शर्मा यांना बसू शकणार आहे. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. जर शर्मा जिंकले तर भाजपच्या हातून हा मतदारसंघ कायमचा जाईल, अशी भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे. प्रदीप शर्मा यांच्या नावामागे वलय आहे, त्यांना भेटण्यासाठी, छायाचित्र काढण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र ती मतात परावर्तित करण्यासाठी त्यांचे कौशल्य पणाला लागणार आहे.

या मतदारसंघातील आश्चर्यकारकरीत्या वाढलेले मतदार संशय निर्माण करणारे असल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीने तर मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी येथील एक लाखांहून अधिक मतदारांची नावे नालासोपारा मतदारसंघात नोंदविली गेल्याचा आरोप केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. बविआने प्रचाराबरोबर बोगस मतदार शोधण्याची मोहीमच सुरू केली आहे.

या मतदारसंघातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. त्यांना बदल हवा आहे. नवीन नालासोपारा मला घडवायचा आहे. मी एक टक्का राजकारण आणि ९९ टक्के समाजकारण करणार आहे. – प्रदीप शर्मा, उमेदवार शिवसेना

शहराचा नियोजनबद्ध विकास सुरू आहे. दीर्घकालीन योजना प्रगतिपथावर आहे. महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत.- क्षितिज ठाकूर, नालासोपारा आमदार