राज्यात सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटलं तरी अद्याप शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. अशातच १० दिवसांपूर्वी अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी स्वतः उपमुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु अद्याप कोणत्याही मंत्र्याला खातं देण्यात आलेलं नाही. खातेवाटपाबद्दल सध्या तिन्ही पक्षांमधील वरिष्ठांमध्ये केवळ चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात थेट दिल्लीत चर्चा होईल असं बोललं जात होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काल (बुधवार, १२ जुलै) सायंकाळी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबद्दल चर्चा होणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी अशी कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नसल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून दिल्लीत अजित पवार आणि माझी भाजपा पक्षश्रेष्ठींची भेट झाली नव्हती, आमच्यात बोलणं झालं नव्हतं. म्हणून आज एक औपचारिक भेट म्हणून आम्ही इथे दिल्लीला आलो आहोत.

हे ही वाचा >> रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत जुंपली; रुपाली चाकणकरांचा भरत गोगावलेंवर हल्लाबोल

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पटेल यांना विचारलं की मंत्रिमंडळ विस्तारावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद आहेत आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे, त्यावर काय सांगाल? या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, आमच्यात अजिबात कुठलाही वाद नाही. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमचे नेते अजित पवार, सुनील तटकरे आणि मी भेट घेतली. सगळ्या गोष्टी आमच्या ठरल्याप्रमाणे स्पष्ट झाल्या आहेत. आजच्या या अमित शाह यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये मुंबईतला कुठलाही विषय नव्हता किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. टीव्हीवर ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत, त्यात तथ्य नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praful patel answer on why ajit pawar meets amit shah in delhi asc